Breaking News

वीजग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे ‘ऊर्जा' चॅट बॉट २४ तास उपलब्ध

Mahavitran's 'Urja' chat bot available 24 hours to serve electricity consumers

    मुंबई, दि. ९ मे २०२४: महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. 

    महावितरणच्या वीजसेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केले आहे. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅट बॉट www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्यूलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉट थेट मदत करीत आहे.  

    वीजसेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या चॅट बॉटमधूनच मिळणार आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध आहे. 

    गेल्या मार्च महिन्यापासून कार्यान्वित झालेल्या ‘ऊर्जा’चॅट बॉटचा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमीट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅट बॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे. 

No comments