Breaking News

माढा लोकसभा मतदारसंघात ६३.६५ टक्के मतदान ; फलटण तालुक्यात सर्वाधिक ६७.५ टक्के


60 percent voting in Madha Lok Sabha Constituency; Highest 67.5 percent in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - माढा लोकसभा मतदारसंघात एकूण  ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या, सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण माढा मतदारसंघात  ६३.६५ टक्के मतदान झाले. माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ९१ हजार ४५४ मतदारांपैकी १२ लाख ६७ हजार ५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा विधानसभा मतदारसंघ ५५.८४ टक्के, माढा विधानसभा मतदारसंघ ६६.४८ टक्के, सांगोला विधानसभा मतदारसंघ ६४.१० टक्के, माळशिरस विधानसभा मतदारसंघ ६६.४३ टक्के, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ ६७.०५ टक्के, माण विधानसभा मतदारसंघ ६१.६६ टक्के मतदान झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघात फलटण विधानसभा मतदारसंघात येथे सर्वाधिक म्हणजेच ६७.०५ टक्के मतदान झालेले आहेत.

     सकाळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व  कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आपला मतदानाचा अधिकार बजावला तर भाजपा महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे तालुका फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला. आमदार दीपकराव चव्हाण यांनी तरडगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सुरवडी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे मतदान केले.

    फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान पोलिंग स्टेशन नंबर ३११ मानेवाडी  येथे झाले. एकूण ४३७ मतदारांपैकी ३८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मानेवाडी येथे एकूण ८८.५६ टक्के मतदान झाले. त्या खालोखाल पोलिंग स्टेशन नंबर २६३ वाघोशी येथे ८३.९४ टक्के मतदान झाले. वाघोशी येथे ६६० मतदारांपैकी ५५४ मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल पोलिंग स्टेशन नंबर २७८ येथे ८३.७९% मतदान झाले. पिंपरद येथे ९०७ मतदारांपैकी ७६० मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल पोलिंग स्टेशन नंबर ३२९ बरड (बागेवाडी) येथे ८१.४० टक्के मतदान झाले.  येथे ७७४ मतदारांपैकी ६३० मतदारांनी मतदान केले.त्या खालोखाल पोलिंग स्टेशन नंबर १०९ सर्कलवाडी (वाघोली) येथे ८१.०७ मतदान झाले सर्कलवाडी येथे ५९७ मतदारांपैकी ४८४ मतदारांनी मतदान केले. 

    फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान पोलिंग स्टेशन नंबर १८२ फलटण शहर येथे झाले येथे एकूण ५४७ मतदारांपैकी २११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथे एकूण ३८.५७  टक्के  मतदान झाले.

    अनेक मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. बऱ्याचशा केंद्रावर महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदार मतदान करण्यासाठी कसे येतील, यासाठी धावपळ करताना दिसत होते. सर्वत्र कडक बंदोबस्त नेमण्यात आलेला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार  घडला नाही.

No comments