Breaking News

भविष्यात फलटण तालुक्याला पाण्याची कमतरता भासणार नाही ; शरद पवार हे जाती-जातीत भांडण लावण्याचे काम करतात - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Phaltan taluk will not face shortage of water in future - MP. Ranjit Singh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - पूर्वी उन्हाळ्यात निरा कॅनॉलचे पाणी आटत होते, परंतु आता ते आटत नाही, कारण नीरा देवघरचे दुसरीकडे जाणारे पाणी थांबवून आपण ते पाणी आपल्याकडे आणले आणि दुष्काळातही पाण्याची पाळी वाढवून, नीरा उजव्या कॅनलला पाणी सोडले, उन्हाळ्यातही पाणी कमी पडू दिले नाही, निरा देवघर,धोम बलकवडीच्या कॅनॉलची कामे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जवळपास ४ टीएमसी पाणी अतिरिक्त मिळणार आहे, उद्धट तावशी येथे पाणी आडवले जाईल, मात्र डेड वॉटर ला माझा विरोध होता, म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा करून, प्रवाही पाणी करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या, आता उद्धट तावशी येथील बोगद्याद्वारे  पाणी उजनी धरणात सोडले जाईल, कांबळेश्वर, मुरूम भागात पाणी अडवल्यानंतर तेथून पाणी उचलून धोम बलकवडी, नीरा देवघर, नीरा उजवा कॅनॉल मध्ये टाकण्याची नवीन योजना आणलेली आहे, त्यामुळे भविष्यात आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

    भाजपा व महायुतीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुका प्रचार दौरा सुरू असून, खासदार रणजितसिंह यांनी  काल गिरवी, कोळकी, बरड, विडणी पिंपरद, आसू, सांगवी, गुणवरे  या पंचायत समिती गणातील समाविष्ट गावातील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. सांगावी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी  माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सचिन कांबळे पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

    पुढे बोलताना खासदार रणजीतसिंह म्हणाले, फलटण बारामती रेल्वे मार्ग मंजूर झाला असून, त्याचे काम सुरू झालेले आहे, आपल्या सांगवी येथे देखील रेल्वे स्टेशन करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर रस्ते मंजूर केले आहेत. फलटण तालुक्यात कुठलाच रस्ता ठेवला नसून, तालुक्यातून महामार्ग व रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. मी खासदार झाल्यापासून माढा मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण केलेली आहेत, विरोधकांना माझ्याविरुद्ध बोलण्यास जागा शिल्लक ठेवली नाही, विरोधक माझ्या कामावर न बोलता इतर आरोप करत असतात, विरोधकांना माझे सांगणे आहे की कामावर बोलावे, शरद पवारांचे राजकीय वय हे माझ्यापेक्षा जास्त असून, त्यांची माझ्याशी बरोबरी होऊ शकत नाही, परंतु मी खासदार झाल्यानंतर प्रथम मतदारसंघाची कामे मार्गी लावली, त्यांनी मात्र मतदारसंघातील रस्ते अडवले, रेल्वे प्रकल्प अडवले, निरा देवघर चे पाणी बारामतीला नेले, सर्व विकास बारामतीला नेला व माढा मतदारसंघात मला वंचित ठेवले.  निवडणूक आली की शरद पवार हे जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करतात.  मराठा, धनगर, माळी समाजात जातीचे राजकारण करून, भांडणे लावून विकासाचे काम मात्र मागे ठेवतात असा आरोप खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

No comments