Breaking News

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, धान्य पुरवठा, रोजगार याचे काटेकोर नियोजन करा - प्रांताधिकारी सचिन ढोले

Make strict planning for drinking water, fodder for animals, grain supply, employment - Provincial Officer Sachin Dhole

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : जनावरे व लोकवस्तीसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, शासनमान्य रास्त भाव दुकानातून नियमाप्रमाणे पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा, शेतमजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार सुविधा आदी प्रमुख बाबींसाठी संबंधीत यंत्रणांना काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना करताना दर शुक्रवारी आढावा बैठक घेऊन अडचणी सोडविण्याचा निर्णय प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या दालनात आयोजित शासकीय यंत्रणांच्या बैठकीत घेण्यात आला, टंचाई निवारणासाठी फलटण तालुक्यात प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    या बैठकीस तहसीलदार डॉ. अभिजित जाधव,गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नीरा - उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपअभियंता संत, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ग्रामोपा, सहाय्यक अभियंता प्रकाश देवकाते यांच्यासह संबंधीत यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    भाटघर, वीर, नीरा - देवघर, गुंजवणी वगैरे सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठे कमी आहेत, भाटघर, नीरा - देवघर, वीर, गुंजवणी या ४ धरणात मिळून दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी २५.५८ टीएमसी म्हणजे ५२.८२ टक्के पाणी साठा होता, त्या तुलनेत गतवर्षी याच तारखेला म्हणजे दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी ३४.८२ टीएमसी म्हणजे ७२.०४ टक्के पाणी साठा होता.

    कमी किंवा काही भागात अत्यल्प पाऊस झाल्याने, आणि यावर्षी नद्या, नाले, ओढे वाहिले नसल्याने, त्यावरील लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, ग्रामतलाव आणि त्या परिसरात असलेल्या विहिरीमध्ये पाणी साठे राहिले नाहीत, तसेच उन्हाची तीव्रता सतत वाढत असल्याने फलटण तालुक्यातील जवळपास सर्व गावात कमी - अधिक प्रमाणात टंचाई जाणवत आहे.

    नीरा - उजवा कालव्याचे आवर्तन सुरु असल्याने त्याच्या लाभ क्षेत्रातील ३०/३५ गावात सद्यस्थितीत चारा/पाणी टंचाई जाणवत नसली तरी आज/उद्या कालवा बंद झाल्यानंतर या क्षेत्रातही टंचाई हळू हळू सुरु होणार असल्याने नजीकच्या काळात संपूर्ण तालुक्यात टंचाई घोषित करावी लागणार आहे.

    प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत प्रशासकीय यंत्रणा निहाय आढावा घेताना, आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आजची स्थिती आणि आगामी ४/५ महिन्यात करावे लागणारे नियोजन याबाबत माहिती घेतली.

    आज तालुक्यातील १७ गावात १० टँकरद्वारे जनावरे व लोकवस्तीसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, भविष्यात गावे व टँकर संख्या वाढणार असल्याने आज फलटण नगर परिषद पाणी पुरवठा योजनेतून टँकर भरुन घेतले जात आहेत, त्याऐवजी सुरवडी औद्योगिक वसाहत, गिरवी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना किंवा जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजना आगामी काळात पूर्णत्वास जात आहेत तेथून किंवा अन्य ठिकाणाहुन टँकर भरुन घेण्याची व्यवस्था झाली तर वेळ व इंधनाची बचत होणार असल्याने त्याबाबत तसेच नव्याने टँकर मागणी असलेल्या गावात संबंधीत अधिकाऱ्यांनी भेट देवून वस्तुस्थिती समजावून घेऊन नियोजन करावे, त्याबाबत नकाशे तयार करावेत, पंचायत समिती कार्यालयात टँकर नियोजन व नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, जीपीएस (GPS) यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

    टंचाई घोषीत किंवा संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात समक्ष भेट देवून तेथील लोकवस्ती व जनावरे संख्या, उपलब्ध पाणी, टँकरद्वारे द्यावे लागणारे पाणी याची माहिती घेऊन गाव निहाय योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी प्रांताधिकारी यांनी केल्या.

    जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात १९ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु असून त्यापैकी ३ योजना मार्च अखेरीस पूर्ण होतील, एप्रिल - मे - जून मध्ये १५ योजना पूर्ण होतील तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १८ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून त्यापैकी १० योजनांचा जलस्त्रोत नीरा उजवा कालवा असल्याने त्यांची अडचण नाही पण उर्वरित ८ योजनांचे जलस्त्रोत गावातील विहिरी असल्याने त्याबाबत अडचण येण्याची शक्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता संत यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.

    पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांना होणारा वीज पुरवठा शेती पंपाच्या फिडरवरुन होत असल्याने वीज पुरवठा वेळेवर, योग्य दाबाने, अखंडित होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सदर सर्व ३७ पाणी पुरवठा योजनांसाठी गावठाण फिडरवरुन वीज पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी असून संबंधीत ग्रामपंचायतींनी त्याबाबत आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट झाल्यानंतर दि. १० मार्च पर्यंत सदर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले.

    पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजनांचा आढावा घेतल्यानंतर चारा टंचाई बाबत नियोजन आढावा घेण्यात आला, त्यामध्ये प्रामुख्याने बागायती पट्ट्यात चारा पिके घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचायत समिती व कृषी खात्यामार्फत चारा बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे, आवश्यक बियाणे उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट संकेत प्रांताधिकारी यांनी बैठकीत दिले.

    शेतमजुरांना काम नसल्याने त्यांनी मागणी करताच रोहियोंतर्गत काम उपलब्ध करुन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सेल्फवर मंजूर करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असता सिंचन विहीर, बांबू लागवड, शोष खड्डे, जलसंधारण, वृक्ष लागवड वगैरे ८३० कामे सेल्फ वर असल्याचे सांगण्यात आले.

    तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव, ग्रामतलाव वगैरे मधील गाळ काढण्यासाठी कंपन्यांचे सीएसआर फंड आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे बैठकीत सूचित करण्यात आले.

    टंचाई निवारण कामांबाबत तसेच टंचाई बाबत अद्ययावत माहिती तातडीने उपलब्ध होण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्तरिय समित्या स्थापन कराव्यात, त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

    वीर धरणातील उपलब्ध पाणी दि.१० मार्च दरम्यान आवर्तनाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त चारा पिके घेण्याचे नियोजन करावे, तसेच भविष्यात चारा डेपो सुरु करावे लागणार असल्याने त्याचे नियोजन करताना ज्या भागात चारा उपलब्ध असेल त्या भागात चारा डेपो असतील तर वाहतूक खर्च व वेळेची बचत शक्य असल्याने त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

No comments