पवारवाडी येथे अल्पवयीन मुलगी व आईची आत्महत्या ; बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ सप्टेंबर - अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून तिला फुस लावून पळवून नेले व तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने व तिच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पवारवाडी ता. फलटण येथील मिंड परिवाराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव मिंड, त्यांची पत्नी राधा सुखदेव मिंड यांना फिर्यादीची भाची (पीडित मुलगी) ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुध्दा त्यांनी, त्यांचा मुलगा गणेश सुखदेव मिंड यास तिला (पीडित मुलीस) लग्नाचे अमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले. त्यातुन गणेश सुखदेव मिंड याने दिनांक २१/०९/२०२३ पीडित मुलीस फुस लावुन, फलटणला नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबध करून, त्याने भाची (पीडित मुलगी) सोबत लग्न करण्यास नकार दिला. ही बाब पीडित मुलगी हिने तिच्या आईला सांगितल्यावर, त्या दोघींनी दिनांक २२/९/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या पुर्वी पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या शेतातील विहरीमध्ये उडया मारून आत्महत्या केली आहे. त्यासाठी सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड हे जबाबदार असल्याची फिर्याद पीडित मुलीचे मामा यांनी दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला, सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड यांच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त करणे, बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट हे करीत आहेत.
No comments