Breaking News

शासनाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे - पालकमंत्री शंभूराज देसाई

The work of the government is based on the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj - Guardian Minister Shambhuraj Desai

सातारा दि. 2 : छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या संकल्पनांवर सध्या शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

     मल्हारपेठ, ता. पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष मिलींद पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.

      छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना आपले वाटावे असे स्वराज्य निर्माण केल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  त्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. रयतेचे राज्य निर्माण केले. सर्वांना प्रेरणा देणारे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. सर्वसामान्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री जनतेपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे ग्रामपातळीवरील शासकीय कर्मचारीच नाही तर अनेक अधिकारीही शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी गावांपर्यंत जात आहेत. एकाच दिवसात 27 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ  देण्याचे कामही आपण केले आहे. त्यामध्ये अनेकांना कृषि अवजारे देण्यात आली. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात आले. अनेक प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले. राज्यात उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यात आली आहे. दावोस येथे उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. याचे कारण सध्याच्या शासनावर उद्योजकांचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

     लोकनेते बाळासाहेब देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की, लोकनेते श्री. देसाई यांनी महाराष्ट्रात समुद्र मार्गे येणाऱ्या प्रत्येकास प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन व्हावे या हेतूनेच गेट वे ऑफ इंडिया येथे त्यांचा पुतळा उभा केला. तसेच शिवाजी पार्क येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यासाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.

    यावेळी राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग अंबी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला.

No comments