आर. के.सी इन्फास्ट्रक्चर वर गुन्हा दाखल करावा ; युवकांच्या कुटुंबियांना ५० लाख मिळावे अन्यथा आर. के.सी. काम बंद पाडू - मोर्चाद्वारे मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : पुणे - पंढरपूर महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव दहा चाकी टिपरने उडवल्यामुळे आमिर शेख व गणेश लोंढे या युवकांचा जागीच मृत्यू झाला. दोन्हीही युवकांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून दोन्हीही युवकांच्या कुटुंबीयांना शासनाच्या व आरकेसी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत मिळाली पाहिजे तसेच आर. के.सी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करून, काळया यादीत नाव समाविष्ट करावे, जोपर्यंत आर. के. सी. कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तसेच त्यांच्या वारसांना निधी मिळत नाही, तोपर्यंत आर. के. सी. कंपनीचे काम बंद पाडण्यात येईल असा इशारा संतप्त मोर्चेकर्यांनी निवेदनाद्वारे दिला.
फलटण येथील उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना फलटण शहरातील नागरिकांनी मूक मोर्चा काढत निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, फिरोज आतार, अशोकराव जाधव, किशोरसिंह नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, सुधीर अहिवळे, हरिष काकडे, अनिकेत अहिवळे, पप्पू शेख, अमीर शेख, अमोल सस्ते, सनी काकडे, सौ.सपना भोसले यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर. के.सी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि कंपनीच्या बेजबाबदार ठेकेदारामुळे त्यांचे चालु मनमानी व बेकायदेशीर कामामुळे फलटणमधील होतकरु निष्पाप तरुणांचा बळी घेतला असुन, हा अपघात, रात्रीच्या चालु असलेल्या गौणखणिज वाहतुकीमुळे झाला असल्याचे दिसत आहे. म्हणुन संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, सदरील आरोपी हा परप्रांतीय असुन, त्याची नोंद घेतली आहे का नाही याची चौकशी करण्यात यावी, त्याबरोबर ठेकेदाराने आपण या अपघाताला कारणीभूत नाही असे भासवण्यासाठी घटनेच्या त्याच रात्री पहाटे ३.०० वाजता दुहेरी वाहतुक सुरळीत करण्यात आली याचाच अर्थ असा होतो की, रस्त्याला बळी देण्यासाठी हे अघोरी प्रकार घडवून आणलेले दिसत आहे. त्यास कारणीभूत जे कोणी आहेत, त्या अधिका-यावर तसेच कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, कारण गेल्या १५ दिवसात अनेक अपघात याच रोडवर झालेले आहेत आणि लोक जिवानीशी गेले आहेत. काहींना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले आहे. परंतु लोकांच्या सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडुन घेतली गेलेली नाही. प्रांत अधिकारी व तहसिलदार अधिकारी यांनी जर ठेकेदारावर अंकुश ठेवला असता, तर आज अमिर शेख व गणेश लोंढे आपल्यात असते व कित्येकांचे प्राण वाचले असते.
अमिर शेख व गणेश लोंढे हे अत्यंत हालाकीतुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते, घरातील कर्ता पुरुष गेल्याने, कुटुंबाचे पुढील जीवन अंधारमय झालेले आहे. त्यांना लहान लहान मुली व मुले आहेत. आज त्यांना आपले वडील कुठे गेले आहेत, ते घरी कधी येणार याची वाट पाहत बसलेले आहेत. त्या मुलांना हे सुद्धा माहीत नाही की, आता आपला कर्ता-धर्ता या जगात कधीच येणार नाही, याचा विचार केला तर मन सुन्न होत आहे. त्या मुलांचे भविष्य त्यांच्या वडीलांविना आईला घडवायचे आहे, त्यांना जगवायचे आहे, त्यासाठी अमिर शेख व गणेश लोंढे यांच्या वारसांना प्रत्येकी ५०-५० लाखाचा निधी देण्यात यावा, तसेच या दोघांचा बळी घेणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा व कंपनीस काळया यादीमध्ये समावेश करण्यात यावे.
जोपर्यंत आर. के. सी. कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तसेच त्यांच्या वारसांना निधी मिळत नाही, तोपर्यंत आर. के. सी. कंपनीचे काम बंद पाडण्यात येईल व पुढे चालु दिले जाणार नाही अशी समस्त फलटणकरांची मागणी आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री सहाययता निधी खासदार निधी, आमदार निधी स्व. गोपिनाथ मुंडे अपघात योजना यामधुन मयत तरुणांच्या कुटुंबांना त्याचा फायदा देण्यात यावा.
मोर्चा फलटण तहसील कार्यालय आल्यावर मोर्चेकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, यावेळी बोलताना नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर दोन्हीही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी बोलताना युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख म्हणाले की, दोन्हीही युवकांच्या कुटुंबाची परिस्थिती ही अत्यंत नाजूक अशी आहे. आगामी काळामध्ये आरकेसी कंपनीच्या माध्यमातून जर दोन्हीही कुटुंबांना भरीव अशी आर्थिक मदत झाली नाही; तर त्यांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल.
यावेळी बोलताना अनिकेत अहिवळे म्हणाले की, फलटण शहरांमधील दोन्हीही कुटुंबांचा उदरनिर्वाह या दोन युवकांच्या माध्यमातूनच सुरू होता. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून व आरकेसी कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर दोन्हीही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे म्हणाले की, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे फलटणमधून रात्रीसुद्धा कंत्राटदार आपली कामे करीत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे कंपनीच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे; त्याचप्रमाणे प्रशासनाने सुद्धा याची दखल घेऊन शासन स्तरावर प्रयत्न करून दोन्हीही कुटुंबांना भरीव मदत करणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते हरिष काकडे म्हणाले की, दोन्ही कुटुंबावर आलेल्या संकटाचे, आपण कल्पनाही करू शकत नाही, दोन्ही कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यामुळे त्यांच्या घराचा आधारच गेला आहे, त्यामुळे दोघांच्या पत्नींना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अमोल सस्ते म्हणाले की, दोन्हीही युवकांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा विचार प्रशासनाने करावा, आम्हाला प्रशासनाला घेराव घालायचा नाही परंतु आमच्या लोकभावना प्रशासनाने समजून घेऊन, लवकरात लवकर आर्थिक मदत या दोन्ही कुटुंबांना करावी.
No comments