Breaking News

फलटण शहरातील पालखी मार्गासह खा. रणजितसिंह यांच्या सर्व मागण्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या मंजूर

विकासकामांचे भूमीपूजन व कोनशिला अनावरणऑनलाइन पद्धतीने करताना केंद्रिय रस्ते व महामार्ग  मंत्री नितीन गडकरी  समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
Union Minister Nitin Gadkari approved all the demands of MP Ranjitsinh, including Palkhi Marga in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केलेल्या, फलटण शहरातील ८  किलोमीटरचा पालखी मार्ग मंजूर करण्याबरोबरच तालुक्यात दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ओव्हर ब्रिज, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसीसाठी जोडरस्ता , दहिवडी रस्त्याचे  महामार्गाच्या रूपांतर करावे, रिंग रॉड पूर्ण करावा व  फलटण विमानतळावर हवाई पट्टी या सर्व मागण्या मंजूर करीत असल्याची घोषणा केंद्रिय रस्ते व महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी केली.  तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल तर संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग सहा महिन्यात पूर्ण होईल. पालखी महामार्गावर पुणे येथे दोन डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार आहेत, पालखी महामार्गावर पालखी मुक्काम स्थळी १ हजार टॉयलेट तसेच निवासाची सोय करून देण्यात येणार आहे, वारकऱ्यांना अनवाणी चालताना उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून दोन टाइल्स मध्ये गवत लावण्याच्या  सूचना दिल्या असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी सांगितले

उंडवडी - कडेपठार- बारामती - फलटण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० चे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करणे, शिंदेवाडी- भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी. डी. चे रुंदीरण व काँक्रिटीकरण करणे या विकासकामांचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण तसेच लोणंद-सातारा रस्ता लोकार्पण सोहळा आज केंद्रिय रस्ते व महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान फलटण येथे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभात ना. गडकरी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील,  आ. दीपक चव्हाण, आ. शहाजीबापू पाटील, प्रल्हादराव साळुंखे पाटील,   चंदरराव तावरे, दिलीपराव येळगावकर, सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख  उपस्थित होते. 

ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा  डिजिटल स्वरूपात

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जे विचार दर्शन दिलेले आहे, ते भविष्यातील पिढीला निर्माण करण्याकरता मिळालेले अमृत आहे, आणि तुकाराम महाराजांच्या गाथेने देखील त्यांचे जीवन व त्यांचे अध्यात्मातील दर्शन आम्हाला दिले आहे, या दोन्हीचे लवकरच डिजिटल स्वरूप तयार करण्याचा प्रयत्न आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी आपल्या समाजावर एक प्रभाव निर्माण केला आहे, हा प्रभाव एवढा मोठा आहे की, आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक मन, हे सर्व संत वांग्मय यांनी संस्कारीत केले आहे. पालखी महामार्गाचे रूपाने मला भाग्य मिळाले आहे की, वारकरी संप्रदायाची सेवा करता आली, पालखी महामार्गावर ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांनी ज्या वृक्षवल्लीचा उल्लेख केलेला आहे, त्या पद्धतीने पालखी महामार्ग वृक्षवल्लीने भरलेला असेल, तसेच आपल्या महाराष्ट्रातील संतांचा इतिहास, संत वाड्मयाचा इतिहास, मराठी सारस्वताचा इतिहास हा पालखी महमार्गावरून चालता चालता पाहता येईल याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवा

शेतकऱ्याला अन्नदाता इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याला ऊर्जादाता बनवा, आता इंधन म्हणून इथेनॉलला परवानगी मिळाली आहे, इथेनॉलचे पंप देखील सुरू होतील,  पाण्यापासून हायड्रोजन ऊर्जा, उसापासून इथेनॉल, कचऱ्यापासून बायोगॅस अश्या पध्दतीने शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी केली. 

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे.  तरी साखर कारखानदारांनी  इथेनॉलच्या निर्मितीसाठी  पुढाकार घ्यावा, यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन २०१४ पर्यंत ४९.०४ कि.मी. होती तर आता ही लांबी ८५८ कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले,  आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.

मुंबई- बेंगलोर महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार  यामुळे या भागातील स्थालांतर कमी होईल.केंद्र शासनाचा देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहिला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संगितले.

खा. रणजितसिंह यांनी मागणी केलेले फलटण शहरांतर्गत 8 कि.मी. चा रस्ता पूर्ण केला जाईल. फलटण  -दहिवडी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करुन सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.  तसेच  शेरेचीवडी व सुरवडी येथे ओव्हरब्रिज मंजूर करण्यात येत आहे, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसीसाठी लिंकिंग रोड, फलटण विमानतळावर हवाई पट्टी या विविध विकास कामांबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही ना. गडकरी यांनी यावेळी दिली.

दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद गडकरी साहेबांच्यामध्ये - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

  यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फलटणमध्ये एवढी मोठी भव्य सभा ही नितीन गडकरी  यांची होत आहे. दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद ही गडकरी साहेब यांच्यात आहे. एकदा शब्द दिला की, तो पूर्ण करण्याचे काम हे नितीन गडकरी करीत असतात. पालखी महामार्गाच्या प्रलंबित फाईल घेऊन, मी गडकरी साहेबांची भेट घेतली,   त्यांनी तातडीने सांगितले की, खासदार ही फाईल पूर्ण होईल. आणि त्यानंतर २५-३० दिवसातच पालखी मार्गाचा प्रश्न निकाली काढला. तसेच बारामती महामार्गाचे निवेदन, गडकरी यांच्याकडे दिल्यानंतर वर्षाच्या आत बारामती महामार्ग मंजूर करण्यात आला असल्याचे  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण शहरामध्ये  जिंती नाका ते  विमानतळापर्यंत व तेथून नाना पाटील चौक पर्यंत जाणारा रस्ता करून द्यावा. फलटण तालुक्यातील शेरेचेवाडी व सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करावा. फलटण विमानतळावर एअर स्ट्रीप तयार करून द्यावी,  पालखी महामार्गामुळे ५० टक्के  रिंग रोड  झाला आहे, त्याला पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड करावा, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसीसाठी जोडरस्ता करून द्यावा, म्हसवड एमआयडीसी मंजूर झाली आहे, त्याला जोड रस्ता करून द्यावा आशा मागण्या आज फलटणकरांसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केल्या.  

फलटण तालुक्यातून जे दोन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून पुढे गेले आहेत, त्यामुळे फलटण शहराचे स्वरूप बदलण्यास वेळ लागणार नाही,  हे महत्वाचे काम गडकरी साहेब आपण केले आहे.  आपण आज जे पुण्यातून चार तासात मुंबईला पोहचत आहोत, ते फक्त गडकरी साहेब यांच्यामुळेच शक्य झाले आहे. आज जो फलटण तालुक्यातून ग्रीन फिल्ड हायवे चालला आहे; ते  अतिशय गरजेच्या वेळी तुम्ही करत आहात. जरी आम्ही दुसऱ्या पक्षातील असलो तरी, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सहकार्य करत असल्याचे सांगून, सातारा जिल्हा हा, पुढील काळात इंडस्ट्रियल डेस्टिनेशन होणार आहे, त्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींशी बैठक आपण दिल्ली, मुंबई किंवा कुठेही घ्यावी, व आमची काही मनोगत असतील तर त्याचाही विचार करावा अशी मागणी  विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्याकडे गेल्यावर  मला शरद पवार साहेबांची आठवण येते.  शरद पवार हे देखील कुठल्याही पार्टीचा माणूस आला तरी, त्यांना सहकार्य करत होते, ती गादी ती परंपरा तुम्ही चालवत आहात, ती कायम राहावी अशी अपेक्षा  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असलेला आळंदी - पंढरपूर महामार्ग व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग असलेला देहू - पंढरपूर महामार्ग हे पालखी महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे उच्च दर्जाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्या निमित्ताने  फलटण तालुका वारकरी संघटनेच्यावतीने ना. नितीन गडकरी यांचे विशेष स्वागत करण्यात आले.

फलटण येथील विमानतळावर ना. नितीन गडकरी यांचे आगमन झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या प्राणगांपर्यंत ना. नितीन गडकरी यांचे भव्य दिव्य स्वागत करत रॅली काढण्यात आली. यामध्ये हत्ती, घोडे, तुतारी, झांजपथकाद्वारे ना. नितीन गडकरी यांची रॅली काढण्यात आली.

No comments