Breaking News

फलटण नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण ; रस्ते न करताच ठेकेदाराला बिल अदा - अनुप शहा

Phaltan Municipal Council is ground for corruption; Pay bill to contractor without making roads - Anup Shah

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण नगरपरिषद हे भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहे, इथे रस्ते न करता ठेकेदाराला बिल अदा करण्यात येत आहेत. ठेकेदार - प्रशासन व माजी सत्ताधारी हे संगनमताने नगरपालिकेच्या पैशावर दरोडा घालण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला.  रस्त्यांची कामे केलेली नाहीत मात्र त्या रस्त्यांची बिले काढण्याचे काम फलटण नगरपालिकेने केले आहे. याबाबत पुढील काळात भाजपा लढा उभा करणार आहे.  शहराच्या प्रत्येक भागातील घोटाळे काढण्याचे काम सुरू केलेले असल्याचे सांगतानाच आपल्या प्रभागात अशा प्रकारचे काही घोटाळे झाले असतील तरी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केले आहे.

    भारतीय जनता पार्टीच्या फलटण तालुका कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी अनुप शहा बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, राजेंद्र काकडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    शहरातील अक्कलकोट स्वामी मंदिर ते सुतार पान शॉप रस्ता तसेच रंगारी महादेव मंदिर ते नदी रस्ता या रस्त्यांची कामे न करताच बिले काढली गेली आहेत. तसेच शहरांमधील विविध रस्त्यांसह विविध विकास कामांची बिले थेट काढण्याचे काम नगरपालिका प्रशासन करीत आहे.  काम निर्णय झालेल्या रस्त्यांची माहिती मागवली असता संबंधित ठेकेदार,  धमकी देत आहेत,  नगरपालिका प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर आगामी काळात भाजपा न्यायालयीन लढा उभा करणार असल्याचे अनुप शहा यांनी स्पष्ट केले. 

    फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची निवृत्ती जवळ आल्याने ते शहरातील कामांकडे लक्ष देत नाहीत.  फक्त टक्केवारीसाठीच ते काम करत आहेत. फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करण्याचे काम नगरपालिकेमध्ये सुरू आहे. परंतु आता नगरपालिका प्रशासनाने सुद्धा एक लक्षात घेणे गरजेचे आहे. आता राज्यांमध्ये तीन चाकी सरकार नाही व सभापती पद सुद्धा नाही त्यामुळे काम करत असताना भान ठेवूनच काम करावे, असेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले.

    फलटण शहरात एकूण सहा असे रस्ते आहेत की ज्याची काम केले नाही परंतु बिले काढली आहेत तसेच काही ठिकाणी काँक्रीटवर डांबरीकरण करण्यात आले आहे त्याचीही माहिती आम्ही मागवली आहे आणि लवकरच ते उजेडात आणू आणि नगरपालिकेचा कोणताही ठेकेदार  भाजपच्या कोणत्याही नगरसेवकाला जर धमकी देत असेल तर, त्या नगरसेवकांच्या पाठीशी  भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहील व धमकी  देणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी स्पष्ट केले. 

     सोमवार पेठ येथील सर्व्हे नं ५३,५४ मध्ये मागील ३०-४० वर्षांपासून नागरिक राहत आहेत, परंतु ती जागा खुली आहे, असे दर्शवून त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. व त्या नागरिकांना बेघर करण्याचा डाव सत्ताधारी मंडळींनी आखला आहे.  याबाबत नगरपरिषदेच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. या जनहित याचिकेच्या माध्यमातून आम्ही लढा उभारला असून, तेथे राहणाऱ्या कुठल्याही नागरिकांना आम्ही बेघर होऊ देणार नाही आणि याठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा गैरवापर  करू देणार नाही  असे  माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.

    फलटण शहरामधील सातारा रोड पासून क्रांतिसिंह नाना पाटील चौका पर्यंत एकही रस्ता व्यवस्थित नाही, डीएड कॉलेज चौक, पृथ्वी चौक या ठिकाणी मुख्याधिकारी किंवा नगर पालिका अधिकारी यांनी दुचाकीवर प्रवास करावा म्हणजे वस्तुस्थिती त्यांच्या समोर येईल, कुठे रस्ता नीट नाही, तर कुठे गटारे नीट नाहीत कित्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत असे दृश्य दिसत असते, हे सर्व आम्ही अधिकाऱ्यांना  प्रत्यक्ष दाखवलेले आहे परंतु ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. त्यामुळेच आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही प्रत्येक प्रभागात जन आक्रोश आंदोलन सुरू करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी सांगितले.

 शेवटी माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी आभार मानले.

No comments