Breaking News

फलटणच्या श्रीराम रथ यात्रेचा आज मुख्य दिवस

Today is the main day of Shri Ram Rath Yatra of Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ : फलटणकरांचे श्रद्धास्थान, प्रभू श्रीराम यात्रा आणि  फलटणकरांचा परंपरागत रथोत्सव (रामयात्रा) यावर्षी रविवार दि. २० नोव्हेंबर पासून सुरु झाला असून   मार्गशीर्ष शु || १, प्रतिपदा गुरुवार दि. २४ नोव्हेंबर देव दिवाळी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.

    फलटण हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक आदर्श संस्थान, या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फलटण संस्थान मध्ये सुमारे २५० वर्षांपूर्वी श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आली आणि त्या वेळेपासून येथील राम रथोत्सव किंवा राम रथयात्रा आजही त्याच परंपरागत पद्धतीने सुरु आहे.

श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर रथ पूजन करताना शेजारी मानकरी व भक्त मंडळी

    नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण नगर परिषद आणि फलटण सह शेजारच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येणारे भाविक भक्त हा रथोत्सव पारंपारिक प्रथा परंपरा सांभाळून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा करतात.

      कोरोना कालावधीत गेले दोन वर्षे रथोत्सवाचे आयोजन न करता मंदिरात सर्व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आणि बंद गाडीतून प्रभू श्रीरामाची नगर प्रदक्षिणा झाली, या वर्षी मात्र परंपरागत पद्धतीने संपूर्ण यात्रा महोत्सव पार पडणार असून त्यासाठी नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि भक्त मंडळी कार्यरत झाली आहेत.

    कार्तिक वद्य एकादशी रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी परंपरागत पध्दतीने महोत्सवाला सुरुवात झाली असून ५ दिवस दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत मंदिर परिसरात प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती ही पाच वाहने परंपरागत पध्दतीने काढण्यात आली आहेत. या सोहळ्यास दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मंदिरात कोजागिरी पौर्णिमे पासून ह.भ.प. सतीश महाराज खोमणे, कोऱ्हाळे, ता. बारामती यांच्या रामायणावरील किर्तनास सुरुवात झाली असून दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रभू श्रीराम मंदिरात त्यांचे किर्तन सुरु आहे.

    कार्तिक वद्य १४ बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रभू श्रीरामाचे रथास ११ ब्राम्हणांचे हस्ते लघु रुद्राभिषेक झाल्यानंतर दुपारी २ वाजता पोषाख म्हणजे सजावटीस मानकऱ्यांच्या हस्ते सुरुवात झाली, त्यापूर्वी श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथपूजन विधीवत संपन्न झाले.

     उद्या मार्गशीर्ष शु|| १ प्रतिपदा, गुरुवार दि. २४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात किर्तन होईल. बरोबर सकाळी ८ वाजता नाईक निंबाळकर राज घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते मूर्ती रथात ठेवण्यात येतील. त्यानंतर परंपरागत मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची रथातून परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा होईल आणि सायंकाळी ७ वाजता रथ श्रीराम मंदिरात पोहोचेल.

    मार्गशीर्ष शु|| ५ सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी 'श्रीं'ची पाकाळणी, काकड आरती व किर्तन होऊन नंतर प्रभू श्रीरामास ११ ब्राम्हणांचे लघु रुद्राभिषेक व महापूजा होऊन यात्रेची सांगता होईल.

       या परंपरागत रथ सोहळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर  यात्रेसाठी विविध प्रकारची दुकाने त्यामध्ये मेवामिठाई व महिलांची आभूषणे तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांचा समावेश आहे. तेथे खरेदीसाठी भाविक गर्दी करतात त्याचप्रमाणे सोहळा शहरातून प्रदक्षिणा करत असतानाही भाविक दर्शनासाठी या सोहळ्यात सहभागी होतात. यात्रेनिमित्त पाळणे, मोठमोठी खेळण्यांची दुकाने तसेच मनोरंजन व करमणूकीचे स्टॉल्सही लागले आहेत.

     श्रीराम रथ यात्रेच्या निमित्ताने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी फलटण नगर परिषद, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट व अन्य संस्थांच्यावतीने जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार असून, त्यामध्ये नामवंत पैलवान हजेरी लावतात. या पैलवानांना इनाम देवून गौरविण्यात येते.

No comments