Breaking News

वधू - वर निवडताना अनुरुप निवडीची अपेक्षा गैर नाही : ॲड. भानुदास राऊत

ॲड. भानुदास राऊत बोलताना व्यासपीठावर मान्यवर
It is not wrong to expect a suitable choice while choosing the bridegroom: Adv. Bhanudas Raut

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : भारतीय संस्कृती मध्ये विवाह संस्था आदर्श असून वधू - वर निवडताना अनुरुप निवडीची अपेक्षा गैर नाही पण अतिरेक होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता नमूद करीत शेतकरी कुटुंबातील योग्य वराची निवड करण्याची अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य आणि माळी समाज महासंघाचे पदाधधिकरी ॲड. भानुदास राऊत यांनी व्यक्त केली आहे.

     महाराष्ट्र माळी समाज महासंघ आणि पाक्षिक महामित्रच्या माध्यमातून महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित माळी समाज राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळाव्यात अध्यक्ष पदावरुन मार्गदर्शन करताना ॲड. भानुदास राऊत बोलत होते. यावेळी  श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, म. फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष  मच्छिंद्र गूळदगड, महाराष्ट्र माळी समाज चेंबर ऑफ कॉमर्सचे गोविंद  डाके, माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना उपाध्यक्ष भीमराव फुले, म. फुले शिक्षण संस्था विडणी सचिव सहदेव शेंडे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, कोळकी ग्रामपंचायत माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, प्रा. संपतराव शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरदराव कोल्हे, महाराष्ट्र साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष  प्रा. नितीन नाळे, किरण दंडीले, कृष्णाथ फुले  उपस्थित होते. 

मेळाव्यास उपस्थित वधू - वर आणि पालक

      प्रारंभी महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष  मच्छिंद्र गूळदगड, अहमदनगर यांचे हस्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करुन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

     कोरोना काळात लॉकडाऊनची घोषणा झाली त्यावेळी अनेक व्यवसाय बंद करण्यात आले, मात्र शेती बंद करा म्हणून सांगण्यात आले नाही, शेती बंद करुन अन्न, भाजीपाल्याची व्यवस्था कशी व कोठून करणार असा सवाल करीत शेतकरी हा देशाचा कणा आहे परंतू दुर्दैवाने आज ५० एकर शेती बागायतदार असणाऱ्या मुलाला वर म्हणून निवडताना, नकार देवून नोकरी करणारा, सरकारी सेवेत कायम असणाऱ्या वराची अपेक्षा केली जाते, ती गैर नाही, पण अशी मुले फार कमी संख्येने असल्याने निवड खुंटते, त्यासाठी मुलींनी  शेतकरी मुलाला न नाकारता, आता आपल्या अपेक्षांना काही प्रमाणात मुरड घालुन शेतकरी कुटुंबातील पण योग्य आणि अनुरुप मुलाच्या निवडीची भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा ॲड. भानुदास राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

   ॲड. भानुदास राऊत पुढे म्हणाले, आज धकाधकीच्या जीवनात मुला, मुलींची लग्न ठरवताना पालकांची होणारी फरपट टाळण्यासाठी मेळाव्याच्या माध्यमातून वधू - वर निवडीसाठी नामी संधी उपलब्ध असते, अनेक वधू - वर त्यांचे पालक तेथे एकमेकांना भेटून चर्चा करु शकतात, एकमेकांविषयी माहिती, आवडी - निवडी, अपेक्षा जाणून घेऊन योग्य वधू अथवा वराची निवड करु शकतात, त्यामुळे वेळ, पैसा, कष्ट वाया जाऊ नये हाच खरा या मेळावा आयोजित पाठीमागचा हेतू असल्याचे स्पष्ट करीत गेली ३१ वर्षे दशरथ फुले हे काम 'सतीच वाण' म्हणून पार पाडत आहेत. माळी समाज महासंघाचेवतीने त्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो.

         ॲड. राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील माळी समाज आपले काम, आपला व्यवसाय भल आणि आपण भल यान्यायाने प्रामाणिक पणे कार्यरत असून ९० % समाज शेती, उद्योग व्यवसायात रमलेला आहे. अलीकडच्या काळात माळी समाजातील मुले/मुली शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत, सरकारने दिलेल्या सोयी सवलतींचा फायदा घेऊन इंजिनिअर, डॉक्टर वगैरे  उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामध्ये प्राविण्य मिळवीत आहेत,  यात एक गोष्ट मात्र खरी आहे, महाराष्ट्रात माळी समाजातील मुलांपेक्षा मुली अधिक  शिकलेल्या आहेत, त्यामुळे ज्यादा शिकलेल्या मुलींना त्यांच्या योग्यतेचा मुलगा मिळू शकत नाही, याची मोठी अडचण झाली आहे. मुलींना आपल्या निवडीला आवर घालावा लागेल पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी यामध्ये बदल होऊन आता शेतीचा नंबर शेवट लागतो तो क्रम बदलून शेतकरी पण योग्य आणि अनुरुप मुलांना प्राधान्य द्या असे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी दशरथ फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत सलग ३१ वर्षे राज्यस्तरीय वधू - वर पालक मेळावा आयोजित करुन समाजातील उपवर वधू - वर व त्यांच्या पालकांना सुसंधी उपलब्ध करुन देण्याबरोबर वर्षभर पाक्षिक महामित्रच्या माध्यमातून या वधू - वरांची माहिती घरपोहोच उपलब्ध करुन देण्याच्या त्यांचा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांचे कौतुक केले. 

    केवळ माळी समाज नव्हे सर्व समाजातील घटकांना त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी योग्य मार्गदर्शन, अधिकारी, पदाधिकारी यांच्या कडे त्यासाठी साकडे घालणे त्यातून अडचण आली तर आंदोलन वगैरे मार्गाने सर्व समाजासाठीही दशरथ फुले अव्याहत कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर दशरथ फुले यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करीत गेली ३१ वर्षे अव्याहतपणे हे काम सुरु असून राज्यातील हजारो माळी समाज बांधवांशी संपर्क निर्माण झाल्याने त्यांना योग्य वधू - वर निवडीसाठी केलेली मदत व मार्गदर्शनाने कृत कृत्य झाल्याचे नमूद केले. या वधू - वर पालक परिचय मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह मुंबई व राज्याच्या अन्य भागातून सुमारे सुमारे ५०० विवाह इच्छुक वधू - वरांनी नाव नोंदणी केल्याचे निदर्शनास आणून दिले. 

   सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी सावता बनकर, शरदराव कोल्हे, सुर्यकांत जाधव , प्रा. शिवलाल गावडे, नवनाथ आदलिंगे, सौ. मिना फुले, किरण फुले, अमित नाळे, शंकर अडसुळ वगैरे असंख्य पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

     प्रा. वसंतराव अडसूळ यांनी सूत्र संचालन आणि प्रा. संपतराव शिंदे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. 

No comments