Breaking News

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra best option for investment in green energy consumption sector - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    मुंबई, दि. 21 : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषणविरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली.

    माईक हँकी यांनी अमेरिका-महाराष्ट्र द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी भेट घेऊन माहिती दिली.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि तालुके सार्वजनिक वाहतुकीने जोडलेले आहेत. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषणविरहित करुन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात राज्यात हरित ऊर्जा वापरावर भर देऊन हरित ऊर्जा उद्योगवाढीला चालना देण्यात येणार आहे. अमेरिकेने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रात तसेच कौशल्य आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हरित ऊर्जा वापरावर भर देत असल्याचे उदाहरण सांगताना उपमुख्यमंत्री यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई- बसेस सुरु केल्याचे सांगितले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचामृत संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्या दृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावले उचलत असून, यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

    राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आवश्यक सुविधांसह सर्व सहकार्य करण्यावर भर देत आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून, येणाऱ्या काळात अमेरिकेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यासाठी पोषक वातारण तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने कौशल्य विद्यापीठ राज्यात स्थापन केले असून, या विद्यापीठाअंतर्गत कौशल्य आधारित उद्योगांचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

    यावेळी माईक हँकी म्हणाले की, महाराष्ट्रातील वास्तव्य आपणास आवडत असून गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांना आपण भेटी दिल्या आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी, हरित ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांत अमेरिकन उद्योजक आपला व्यवसाय करत असून येणाऱ्या काळात अमेरिकेतील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याही ते म्हणाले.

    यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबईचे वाणिज्यदूत यांचे राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक, डॉ. मनिष मल्के उपस्थित होते.

No comments