Breaking News

समाजाची ताकद भविष्याचा विचार करणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून पुढे न्यायला पाहिजे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ; मंगळवार पेठेची नगरपालिकेपासून मला साथ

Program on Dhamma Chakra parivartan Din : The strength of the society should be furthered through organizations that think of the future - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ - जग हे झपाट्याने बदलत चालले आहे, मागे राहणारा हा कायम मागे राहणार आहे, कोण कोणाला दोष देऊ शकणार नाही, आपल्याला आता संधी आली आहे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा याचे अनुकरण करण्याची. डॉ. बाबासाहेबांच्या वेळचा संघर्ष व सध्याचा संघर्ष हा थोडासा वेगळा आहे, आणि हा संघर्ष करण्यासाठी ज्या प्रकारचे शिक्षण लागते ते आपल्याला घ्यावे लागणार आहे, ज्या प्रकारच्या संघटना भविष्यात लागतील, त्या संघटना बांधाव्या लागणार आहेत, पुढच्या भविष्याचा विचार करणाऱ्या संघटना एकत्र आणायला लागणार आहेत, आणि ही समाजाची ताकद आहे ती, अशा संघटनाच्या माध्यमातून पुढे न्यायला पाहिजे असे आवाहन विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सनी(दादा) अहिवळे, हरिष काकडे (आप्पा), संग्राम अहिवळे व सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दिपकराव चव्हाण, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

     १९९५ सालापासून  मंगळवार पेठेने व समाजाने  संबंध तालुक्यात, जिल्ह्यात  मला नगरपालिकेपासून साथ दिलेली आहे, माझे आजोबा मालोजीराजे यांनी जपलेले हे संबंध, आम्हालाही थोडेफार जपता आले, तुमचे प्रेम मिळवता आले, तुमचे आशीर्वाद मला मिळवता आले, त्यानिमित्ताने तुमची राजकीय ताकद मला मिळाली, हे मी कधीही विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गार काढतानाच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संयोजकांनी असे मेळावे वरचेवर घेऊन, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

    आ.दीपक चव्हाण म्हणाले की, आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रार्थना आचरणावर चालणारे आहोत .तथागत भगवान बुद्धांचे विचार तळागाळा पोहोचवण्याची आपली जबाबदारी असून, आपण ती जबाबदारी योग्य रीतीने पार पडाल अशी मला आशा आहे. बौद्ध समाज हा इतर बहुजन समाजाला सोबत घेऊन काम करत असल्याचे चित्र फलटण तालुक्यामध्ये वेळोवेळी दिसत आहे आणि हे काम लोकशाहीसाठी पूरक असल्याचे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

    कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले व नंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार हार व सन्माचिन्ह देऊन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

    या वेळी गायिका कडूबाई खरात यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम झाला तर 'चांडाळ चौकडी च्या करामती' या फेमस वेब सिरीज मधील कलाकार रामदास जगताप (रामभाऊ), भरत शिंदे (बाळासाहेब) सुभाष मदने ( तंटामुक्ती अध्यक्ष),  आमिर अहिवळे, मुकुंद मोरे (गीतकार) यांनी अदाकारी दाखवली.  या सर्व कलाकारांचा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर  व आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

    सूत्रसंचालन आनंद पवार सर यांनी केले तर आभार सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णाताई अहिवळे यांनी मानले.

No comments