साखरवाडी कारखाना कामगारांना २० % बोनस, मागील देण्यापैकी तडजोडीत ठरल्याप्रमाणे रक्कम देणार : अजितराव जगताप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्री दत्त इंडिया प्रा. ली., साखरवाडीच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार कामगारांना २० % बोनस, मागील देण्यापैकी चर्चेत ठरल्याप्रमाणे रक्कम टप्प्याटप्याने आणि प्रत्येकी १ किलो साखर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांची दिवाळी यावर्षी सुखा समाधानाची होणार असल्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले आहे.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कारखाना व्यवस्थापन, कामगार युनियन पदाधिकारी, साखर कामगार प्रतिनिधी मंडळ अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला असून या बैठकीस कारखान्याचे संचालक जितेंद्र धरु, करण रुपारेल, प्रशासन अधिकारी अजितराव जगताप, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, मच्छिंद्र भोसले, संतोष भोसले, सुहास गायकवाड, संजय जाधव, गोरख भोसले उपस्थित होते.
एनसीएलटी कडून कारखाना दत्त इंडिया प्रा. ली., कंपनीकडे हस्तांतरीत होत असताना कामगारांच्या देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने कामगारांची देणी प्रलंबीत राहिली होती त्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन चर्चेत ठरल्याप्रमाणे कामगारांची देणी देण्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने सहमती दर्शविली आहे, तथापि भविष्य निर्वाह निधीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही, मात्र मागील थकीत देणी तडजोडीत ठरल्यानुसार टप्प्याटप्याने अदा करण्यात येणार आहेत, तर दिवाळी सणासाठी प्रत्येकी एक किलो साखर देण्याचा निर्णय झाल्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी गतवर्षी गाळपास दिलेल्या ऊसाला प्रती टन १ किलो प्रमाणे साखर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय झाला असून त्याचे वितरण सुरु झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
No comments