युवा नेते सह्याद्री कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) २ जून- जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवा नेते सह्याद्रीभैय्या सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. ३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या राजीव गांधी पॉलीटेक्निक कॉलेज, झिरपवाडी, ता. फलटण येथे भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले असून, कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कुस्ती आखाड्यात गंगावेस कोल्हापूर वस्ताद विश्वास हारगुले यांचा पठ्ठा, उप महाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर आणि हरियाणा केसरी पै. बंटी हरियाणा यांच्यात प्रथम क्रमांकाची २ लाख रुपये इनामाची तर छ. आखाडा कुर्डुवाडी अस्लम काझी यांचा पठ्ठा पै. महारुद्र काळेल आणि नाना वस्ताद यांचा पठ्ठा पै. मुन्ना झुंझुर्के यांच्यात द्वितीय क्रमांकाची दीड लाख रुपये इनामाची कुस्ती होणार आहे.
या शिवाय अर्जुनवीर काका पवार पठ्ठा, बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथील पै. जयदीप गायकवाड (वाखरी) आणि सह्याद्री संकुल पुणे काका बराटे यांचा पठ्ठा पै. नागेश शिंदे यांच्यात १ लाख रुपये इनामाची तिसरी आणि छ. आखाडा कुर्डुवाडी पै. मनोज माने व पै. शंकर बंडगर यांच्यात १ लाख रुपये इनामाची चौथ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
त्याशिवाय पै. आकाश माने व पै. सागर शिंदे, पै. तुषार सरक व पै. विकास शिंदे, पै. गणेश कोकरे व पै. निकेतन पाटील, पै. संदेश शिपकुले व पै. ओंकार कोकाटे या ५० ते १५ हजार रुपये पर्यंतच्या इनामी कुस्त्या होणार आहेत. तसेच अन्य १२/१५ चटकदार कुस्त्या या आखाड्यात होणार आहेत. एकूणच कुस्ती शौकिनांसाठी हे अत्यंत उत्तम, दर्जेदार कुस्त्यांचे भव्य मैदान भरणार असल्याने फलटण आणि शेजारच्या तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी याचा अवश्य आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या कुस्ती आखाड्यातील कुस्त्या समक्ष तर पाहता येतीलच त्याशिवाय मोठ्या स्क्रीनवर सदर कुस्त्यांचे जंगी मैदान पाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कुस्ती आखाड्याच्या निवेदनात निष्णात असलेले शंकर आप्पा पुजारी आणि प्रा. अजय कदम (मठाचीवाडी) यांचे प्रोत्साहन देणारे आणि आखाड्यातील पैलवानांची कारकीर्द, त्यांच्या वस्तादाविषयी आणि कोणत्या डावावर, कोणत्या पैलवानाला कधी, कोणी चितपट केले याचे वर्णन ऐकविणारे समालोचन निश्चित आपली उत्कंठा वाढविणारे ठरणार असल्याने चुकवू नये असे हे मैदान असेल याची ग्वाही संयोजकांनी दिली आहे. या निवेदकांच्या जोडीला इचलकरंजी येथील प्रख्यात हलगी वादक राजू आवळे यांची हा या आखाड्यात अधिक रंगत आणणार आहे.
या आखाड्याचे नियोजन, मार्गदर्शन महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे, महाराष्ट्र केसरी गोरख सरक, उप महाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ आणि तालुक्यातील मान्यवर वस्ताद मंडळी पाहणार आहेत. दुपारी 2 ते 4 या वेळेत कुस्त्या जोडल्या जाणार असून फिरवून एकही कुस्ती लावली जाणार नसल्याचे संयोजकांनी अगोदर जाहीर केले आहे. पंचाचा निर्णय हाच अंतीम निर्णय राहणार आहे.
जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, युवा नेते सह्याद्री भैय्या सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ४ जून रोजी त्यांच्या सूर्या निवास, कमला निंबकर बालभवन शेजारी, लक्ष्मीनगर, फलटण या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यात येणार आहेत.
No comments