ट्रायल घेण्यासाठी गेल्याल्या गिऱ्हाईकाने बुलेट केली लंपास ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ जून - ओएलएक्स (olx) या सोशल नेटवर्किंग साईटवरील बुलेट विक्रीची जाहिरात पाहून, बुलेट खरेदी करण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाने बुलेटची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून बुलेट घेऊन गेला तो परत आलाच नाही. याप्रकरणी शिंदेवाडी ता.फलटण येथील सौरभ सावंत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गिरीष सुरेश काटे रा. फडतरवाडी ता. फलटण यांना त्यांच्या मालकीच्या बुलेट क्र. एमएच १२ एलबी ९१९९ या दुचाकी वाहनाची विक्री करायची होती. त्यासंदर्भात मोटार मॅकॅनिकल अजय अरुण खोमणे यांच्याकडे विकण्यासाठी दिली होती. मॅकेनिक अजय खोमणे याने ओएलएक्स (OLX) वर गाड़ीचे फोटो व गाड़ी विकण्याबाबत जाहीरात दिली होती. दि. २३ मे २०२२ रोजी दुपारी १.२३ वाजण्याच्या सुमारास अजय खोमणे यांच्या मोबाईल क्रमांकवर सौरभ सावंत याचा फोन आला. मी शिंदेवाडी गावचा राहणारा असून मला तुम्ही दिलेल्या ओएलएक्स (OLX) वरील जाहीरातीमधील गाड़ी बघायची आहे असे सांगितले. त्यानंतर फलटण येथे घडसोली मैदान, एच.डी.एफ.सी बँकसमोर गाडी दाखवण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे एच.डी.एफ.सी बँकेसमोर गाडी घेऊन अजय खोमणे आले. त्यावेळेस सौरभ सावंत यांनी गाडीची पाहणी करून, किंमत विचारली व मी एक ट्रायल मारून येतो व माझ्या मॅकेनिकला गाड़ी दाखवतो असे म्हणून, पृथ्वी चौकाकडे गाडी घेवून गेला, तसा तो बराच वेळ परत आला नाही, अजय खोमणे याने त्याची एक तास वाट पाहिली त्याच्या मोबाईल नंबरवर बरेच फोन केले, परंतु त्याने फोन उचलला नाही व फोन बंद केला. त्यानंतर अजय खोमणे याने फलटण शहरात सदर इसमाचा व बुलेट मोटार सायकलचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. सौरभ सावंत रा. शिंदेवाडी ता. फलटण जि. सातारा या नावाच्या व्यक्तीने बुलेट मोटारसायकल खरेदी करण्याची आहे असा बहाणा करून, विश्वास संपादन करून, बुलेट मोटार सायकलची किंमत वगैरे विचारून त्याची ट्रायल मारून येतो असे सांगून घेवून गेला तो माघारी परत आला नसल्याची फिर्याद गिरीष सुरेश काटे यांनी दिली आहे.
No comments