Breaking News

पालखी सोहोळा जबाबदारी नियोजन बद्ध रीतीने पार पाडावी : संचालक, आपत्ती व्यवस्थापन कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर

तरडगाव पालखी तळ पाहणी केल्यानंतर सूचना करताना कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर समोर तहसीलदार समीर यादव, उप सरपंच प्रशांत गायकवाड, पोलिस पाटील भारत आडसुळ वगैरे

Palkhi ceremony should be carried out in a responsible manner

फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा)  : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असताना  पालखी सोहोळा, दर्शन बारी आणि गर्दी आदी व्यवस्था नियोजन बद्ध  पार पाडणे कामी प्रशासनातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी असे आवाहन संचालक आपत्ती व्यवस्थापन यशदा पुणे कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर यांनी केले आहे.

       संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा आषाढी वारीसाठी आळंदीहुन पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून दि. २८ जून ते दि. ४ जुलै दरम्यान सोहोळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने त्याचे योग्य नियोजन करुन शांततेत आणि सुरक्षीत सोहोळा संपन्न होईल यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी येथील नगर परिषद सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर बोलत होते. 

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कर्नल विश्वास सुपनेकर शेजारी उपस्थित अधिकारी

        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हणकर,  फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटणचे तहसीलदार समीर यादव, खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, फलटणच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, फलटण व लोणंदचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी फलटण डॉ. विक्रांत पोटे, तालुका आरोग्य अधिकारी खंडाळा डॉ. अविनाश पाटील, फलटण शहर व ग्रामीण आणि लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत कींद्रे, धनंजय गोडसे, विशाल वायकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता उपस्थित होते.   

        संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा सातारा जिल्ह्यातून जात असताना लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळावर सोहोळा मुक्कामी असणार आहे, त्यापैकी लोणंद आणि फलटण येथे प्रत्येकी २ दिवस आणि उर्वरित २ ठिकाणी १ दिवस मुक्काम राहणार आहे.  सदर सोहोळ्यात लक्षावधी भाविक आणि वारकरी सहभागी होत असतात. त्यामुळे पालखी तळ, मार्गावरील विसाव्याची ठिकाणे, सकाळची न्याहारी आदी ठिकाणे आणि एकूणच वारीचे नियोजन आणि सुरक्षीतता याचे सुत्रबद्ध नियोजन करुन सोहोळा व्यवस्थित पार पाडण्याची आवश्यकता यावेळी कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर यांनी सर्वांना समजावून देत जबाबदारीची जाणीव करुन दिली.

    या प्रशिक्षण वर्गापूर्वी संचालक आपत्ती व्यवस्थापन यशदा पुणे कर्नल (निवृत्त) विश्वास सुपनेकर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील पालखी तळ, सकाळ व दुपारचा विसावा ठिकाणे, पालखी मार्ग यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तहसीलदार समीर यादव यांनी फलटण तालुक्यातील ३ पालखी तळ, उभे रिंगण व विसाव्याची ठिकाणे आणि पालखी मार्ग येथे केलेल्या आणि सुरु असलेल्या कामांबाबत माहिती दिली.

       सोहोळा व्यवस्थेसाठी फलटण तालुक्यातील सर्व अधिकारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, महसूल मंडलाधिकारी, तलाठी, फलटण व खंडाळा पंचायत समिती, फलटण नगर परिषद, लोणंद नगर पंचायत आणि पोलिस व कृषी खात्याचे कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.

No comments