Breaking News

शेअर मार्केट मध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

Fraud by showing the lure of doubling money in the stock market

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ - शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुकीतून पैसे दुप्पट करून देतो, असे म्हणून साखरवाडी येथील एकाची  ७  लाख ६६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी साखरवाडी ता. फलटण येथील पांडूरंग दत्तात्रय चव्हाण यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान फलटण ग्रामीण पोलिसांनी चव्हाण यास अटक केली असून, त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

       याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, होळ ता. फलटण येथील विक्रम जगन्नाथ भोसले यांची व पांडूरंग चव्हाण यांची साखरवाडी येथील ग्राहकसेवा केंद्रात ओळख झाली. पांडुरंग चव्हाण याने विक्रम भोसले यांचा विश्वास संपादन करुन, त्यांना तुम्ही, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा, मी त्या पैशाचे डबल पैसे करून  तुम्हाला  देतो, असे सांगत, गावातील बऱ्याच लोकांना दुप्पट रक्कम करून दिली आहे असे सांगितले. विक्रम भोसले यांनी पांडुरंग चव्हाण याच्यावर विश्वास ठेवून गुगल पे वरुन १६ ऑगस्ट २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत वेळोवेळी, पांडुरंग चव्हाण यांच्या  खात्यात एकुण ७ लाख ६६ हजार ५०० रुपये ट्रान्स्फर केले.  परंतू पांडुरंग चव्हाण याच्याकडून ५९ हजार १०० रुपये एवढाच शेअर मार्केटचा परतावा विक्रम भोसले यांना मिळाला आहे. उर्वरित रक्कम मागूनही ती देण्यात आली नाही. त्याच बरोबर मच्छिंद्र उत्तम मोरे, सचिन चंद्रकांत भाकरे दोघेही रा. साखरवाडी ता. फलटण व बळीराम जयराम होडशिळ रा. गितेवाडी ता. जामखेड ( अहमदनगर ), ऋषिकेश रामलिंग भांगे रा. बीड या उसतोड मजूरांचीही फसवणूक झाल्याचे समजत असल्याचे विक्रम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पांडूरंग चव्हाण यास अटक केली आहे. अधिक तपास  पोलीस निरीक्षक गोडसे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे  करत आहेत.

No comments