Breaking News

फलटण कोरेगाव मतदार संघात ३२२ कोटी रुपये खर्चाच्या १९ पाणी पुरवठा योजना मंजूर : ४ योजनांच्या कामांचा शुभारंभ

आ. दिपकराव चव्हाण बोलताना व्यासपीठावर श्रीमंत संजीवराजे, डॉ. शेंडे व मान्यवर.
19 water supply schemes costing Rs. 322 crore sanctioned in Phaltan Koregaon constituency

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ जून - केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभागामार्फत फलटण विधानसभा मतदार संघात एकूण ३२२ कोटी रुपये खर्चाच्या १७ नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून योजनेत समाविष्ट गावामधील प्रत्येक कुटुंबाला दरडोई ५५ लिटर स्वच्छ, शुद्ध पाणी नळाद्वारे घराघरात उपलब्ध होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    अलगुडेवाडी - धुळदेव या दोन गावांसाठी सुमारे १९ कोटी रुपये खर्चाच्या मंजूर पाणी पुरवठा योजना साठवण तलाव, जलशुध्दीकरण यंत्रणा, उंच टाकी वगैरे उभारणी फलटण - आसू रस्त्यावर मांगोबा माळ परिसरातील अडीच एकर भूखंडावर करण्यात येणार असून सदर जागेवर झालेल्या भूमीपूजन व योजना कामाचा शुभारंभ  आ. दिपकराव  चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एस. डी. कुलकर्णी आणि सूरज पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप अभियंता डी. पी. संत, शाखा अभियंता एस. एस. शिंदे आणि ई. ए. विजापुरे, योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, पुणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

आलगुडेवाडी - धूळदेव योजना कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी आ. चव्हाण व अन्य मान्यवर

         पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाणी नसेल तर अनेक साथीचे आजार पसरतात, विविध रोगराई निर्माण होत असल्याने प्रत्येक गावात स्वच्छ, शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याला प्राधान्य देवून नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या, तथापी त्यापैकी काही योजनांचे जल उद्भव आटले किंवा विहिरींचे पाणी क्षारयुक्त झाल्याने सदर योजना निकामी ठरत असताना तेथे कायम स्वरुपी उत्तम योजना उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ५०/५० टक्के निधीतून या योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी नीरा उजवा कालवा जल उद्भव निश्चित करण्यात आल्याचे सांगून आगामी काळात सर्व गावांना स्वच्छ, शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

    महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने गेल्या २०/२५ वर्षात  मतदार संघात पोहोचलेले कृष्णेच्या पाण्याद्वारे तालुका १०० टक्के बागायत करण्याचा यशस्वी प्रयत्न, आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य देतानाच वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते वगैरे नागरी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात यश मिळविले असल्याचे नमूद करीत त्याचाच एक भाग म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत १९ नळ पाणी पुरवठा योजनांसाठी ३२२ कोटी ही जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम मंजूर करुन घेऊन ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यशस्वी होत असताना धुळदेव - अलगुडेवाडी योजनेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरीटीज ट्रस्टची अडीच एकर जागा बक्षीस पत्राने उपलब्ध करुन देवून योजनेचे काम मार्गी लावल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

     प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एस. डी. कुलकर्णी यांनी धुळदेव - आलगुडेवाडी योजना चालवीताना वीजेचा खर्च कमीत कमी येईल आणि योजना देखभाल दुरुस्तीचा मोठा भार ग्रामपंचायतींवर येणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली असल्याचे नमूद करीत केवळ शुद्ध पाणी ८० फूट उंच टाकीत चढविण्यासाठी वीज मोटार वापरावी लागेल, मात्र कालव्याचे पाणी साठवण तलावात, तेथून जलशुध्दीकरण यांत्रणे पर्यंत आणि उंच टाकीतून दोन्ही गावातील ८ उंच टाक्यांमध्ये वीजेशिवाय पोहोचेल अशी रचना करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.

    प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य तांबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर दोन्ही गावचे सरपंच व्यंकटराव दडस व सौ. शिंदे यांनी पुष्पहार घालून मान्यवरांचे सत्कार केले. समारोप आभार राष्ट्रवादीचे आण्णा मोरे यांनी समारोप व आभार मानले.

    कार्यक्रमास सर्वश्री माणिकराव कर्णे, संभाजीराव निंबाळकर,  अलगुडेवाडी सरपंच सौ. मंगल शिंदे व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, धुळदेव सरपंच व्यंकटराव दडस, ग्रामपंचायत सदस्य वैभव कर्णे, अभिजीत ढगे, राजाराम तांबे,   राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आण्णा मोरे, माजी सरपंच मनोहर कुदळे, डॉ. तावरे, डॉ. अभंग, डॉ. निकम, राजेंद्र पवार, भैरु चौगुले, एकनाथ वीटकर, अनिल गायकवाड, विलास चव्हाण, ज्ञानदेव नरुटे, किसन कोकरे, भारत पवार, हरिभाऊ चव्हाण, डॉ. सचिन पोळ, रामचंद्र गुंडाप्पा सोनवलकर, बाजार समिती संचालक परशूराम फरांदे, विकास सोसायटी चेअरमन धुळा नाना सोनवलकर, चंद्रकांत शिवराम जाधव, मिलिंद अंकुश निंभोरे, ॶॅड. सचिन महामुनी, राजाभाऊ सोनवले, बाळासाहेब काळे यांच्यासह दोन्ही गावे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

    दरम्यान आज सोमंथळी, वाठार निंबाळकर, खामगाव - होळ या पाणी पुरवठा योजनांच्या कामाची भूमिपूजने व प्रत्यक्ष कामाचे शुभारंभ आ. दीपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

No comments