Breaking News

फलटण येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी

The famous Ghodyachi Yatra at Phaltan on Thursday. On April 21

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्री क्षेत्र फलटण महानुभाव पंथाची दक्षिण काशी येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी परंपरागत पद्धतीने संपन्न होणार आहे.

    सदर घोड्याची यात्रा दि. १६ एप्रिल पासून सुरु झाली असून रोज मंदिरांमध्ये प्रवचन, कीर्तन, पारायण, इत्यादी कार्यक्रम सुरु आहेत. नेहमी प्रमाणे होणारा दि. १६ ते १९ रोजी रात्रीचा छबिना रद्द केला असून बुधवार दि. २० रोजी रात्री ८ वाजता सार्वजनिक छबिना श्रीकृष्ण मंदिर ते आबासाहेब मंदिर निघणार असून यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दि. २१ एप्रिल आहे.

    यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी १  वाजता आबासाहेब मंदिर, मारवाड पेठ येथून पालखी, घोडे, छबिना नगर प्रदक्षिणेला निघणार आहे. या प्रसंगी पालखीचे पूजन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होईल त्याचवेळी आबासाहेब मंदिर मधील मुख्य स्थानाचे पूजन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,  समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार  समीर मोहन यादव,  फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक भारत किंद्रे तसेच श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे विश्वस्त बाळासाहेब ननावरे यांनी सांगितले आहे.

    या दिवशी छबिना दुपारी १ वाजता निघून रात्री ८ वाजता मंदिरांमध्ये परत येईल श्री तीर्थक्षेत्र फलटण महानुभाव पंथ यांची दक्षिण काशी असून येथील घोड्याचे यात्रेसाठी भारत भरातून महाराष्ट्रासह विशेषत: पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा  इत्यादी राज्यातून भक्तगण फलटणमध्ये येत असतात. दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीवर घोडा यात्रा रद्द झाली होती, त्यामुळे यावर्षी भक्तांचा महापूर लोटेल अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यादृष्टीने सर्व व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे  अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प.पू. आचार्य श्यामसुंदर शास्त्री विद्वांस बाबा व विश्वस्त  बाळासाहेब ननावरे यांनी कळविले आहे.

No comments