क्रिकेटच्या मैदानावर राहिलेली सेंचुरी रामराजे आयुष्याच्या मैदानावर नक्की पूर्ण करतील - उपमुख्यमंत्री अजित पवार
(अॅड.रोहित अहिवळे ) - महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी १९९५ साली पहिल्यांदा विधिमंडळात पदार्पण केले, आणि त्यानंतर कित्येक वर्ष विधानसभेत काम केलं आणि त्यानंतर विधान परिषदेत काम करत आहेत. श्रीमंत रामराजे हे अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभ्यासू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वं म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व इतर ९ सदस्य हे विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या निरोप समारंभ प्रसंगी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या कारकीर्दीविषयी व सभागृहातील कामगिरी विषयी आपले विचार व्यक्त केले.
श्रीमंत रामराजे हे फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याचे २९ वे वंशज असल्यामुळे त्यांचे जनमानसात वेगळे स्थान आहे. कायद्याचे प्राध्यापक, फलटणचे नगराध्यक्ष, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आमदार, राज्याचे मंत्री, विधान परिषदचे सभापती अशा जबाबदाऱ्या श्रीमंत रामराजे यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. गेल्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनात काम करत असताना, बऱ्याच सभापतींच्या कामाची पद्धत आम्हाला पाहायला मिळाली आहे, त्यामध्ये सभापती फरांदे असतील, सभापती जयवंतराव टिळक असतील, तशाच पद्धतीने श्रीमंत रामराजे यांची कारकीर्द उजवी अशी पाहायला मिळाली आहे. रामराजे यांनी त्यांच्या कार्यातून विधिमंडळ सभागृहाची उंची वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. या विधिमंडळात काम करताना कित्येक वेळा सत्ताधारी व विरोधी पक्षांतील सदस्यांमध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे विचार, मत येतात, पण सभापती रामराजे यांनी दोन्ही बाजूच्या सभासदांचे विचार ऐकूण, त्याच्यातून समन्वय साधून, त्याच्यातून मार्ग काढलेला आम्ही सर्वांनी पाहिला आहे, रामराजे यांनी कोणत्याही पक्षाला झुकतं माप दिलं असं मला जाणवलं नाही, अतिशय निष्पक्षपातीपणे जबाबदारी पार पाडून सर्व सदस्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
राजकीय नेते म्हणून रामराजे यांची ओळख असली तरी, त्यांनी क्रिकेट या खेळावर प्रथमपासून प्रेम केले आहे, महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये देखील पात्र खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांची निवड त्यावेळी झाली होती, इतकच नाही तर सुनील गावस्कर व रामराजे साहेब यांचे क्रिकेटमधील कोच देखील एकच होते, सभापतींना कमल भांडारकर सरांनी क्रिकेट शिकवलं त्याच कमल भांडारकर सरांकडून काही काळ सुनील गावसकर यांनाही क्रिकेट प्रशिक्षण घेतले होते. दुर्दैवाने असा कुठला खेळ खेळत असताना दुखापत होत असते, त्याच प्रकारे श्रीमंत रामराजे यांना देखील गुडघ्याची दुखापत झाली व त्यांना क्रिकेट सोडावे लागले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे महाराष्ट्राला व देशाला एका चांगल्या क्रिकेटपटूला मुकावे लागले असे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त करून सभापती रामराजे यांनी खेळलेल्या क्रिकेटच्या शेवटच्या मॅचमध्ये ८२ धावा काढल्या होत्या, १८ धावांनी सभापतींची सेन्चुरी हुकली होती, पण मला विश्वास आहे क्रिकेटच्या मैदानावर राहिलेली सेंचुरी ते आयुष्याच्या मैदानावर नक्की पूर्ण करणार आशा शुभेच्छा दिल्या.
जुलै महिन्यात जरी रामराजे यांची आमदारकीची टर्म संपत असली तरी आमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत की, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावे अशा शुभेच्छाही दिल्या, श्रीमंत रामराजे जसे विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य झाले, तसेच पुढील काळात एकदा पार्लमेंटचे देखील सदस्य व्हावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments