 |
| प्रदर्शनाचा शुभारंभ करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शेजारी जिजामाला नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळूंखे-पाटील व अन्य |
Shining Maharashtra 2022 exhibition launched by Ranjit Singh Naik Nimbalkar
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत जाधववाडी, फलटण येथे भरवण्यात आलेले "शायनिंग महाराष्ट्र" हे प्रदर्शन शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायीक, महिला अशा समाजातील सर्व घटकांना दिशा देणारे ठरेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांनी व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून फलटण शहरालगत, जाधववाडी ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स मंगल कार्यालय येथे २५ ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रालयांतर्गत विविध विभागांचे स्वराज फौंडेशन व सांसा फौंडेशन आयोजित "शायनिंग महाराष्ट्र" या प्रदर्शनाचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, तहसिलदार समिर यादव, गटविकास अधिकारी अमिता गावडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत खुले राहणार असलेल्या या प्रदर्शनामध्ये केंद्र शासनाच्या विविध ५५ विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी विभाग, संरक्षण विभाग, अंतराळ विभाग, अक्षय ऊर्जा विभाग, आयुष मंत्रालय, पोस्ट खाते आदी विभागसमाविष्ट आहेत. सदर स्टॉलद्वारे त्या त्या विभागाचे महत्व, त्यांच्या योजना त्यांची अंमलबजावणी कशी व्हावी, त्यांची उपयुक्तता, शेतीविषयक, प्रदुषणविषयक, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, नाबार्ड योजनेतील महिला बचत गटाचे स्टॉल, बांबु पासुन बनविण्यात आलेल्या वस्तू, विविध औषधे, तंत्रज्ञान यांची माहिती व प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. या शिवाय खादी आणि ग्रामोद्योग विकास अंतर्गत खादी, दोर, ताग, पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) हातमाग आणि ग्रामीण कारागीरांची हस्तकला यांचाही या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलावर्ग व ज्येष्ठ मंडळी, नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती या प्रदर्शनामध्ये प्राप्त होणार आहे, त्यामुळे या प्रदर्शनाला सर्वांनी सहकुटूंब भेट द्यावी असे आवाहण आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments