Breaking News

२५ मार्च पासून जाधववाडी येथे शायनिंग महाराष्ट्र २०२२ प्रदर्शनाचे आयोजन

Organizing Shining Maharashtra 2022 Exhibition at Jadhavwadi from 25th March

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून फलटण शहरालगत जाधववाडी, ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे दि. २५ ते २७ मार्च दरम्यान केंद्रीय मंत्रालयांतर्गत विविध विभागांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून व्यापारी, उद्योजक यांच्यासह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

    केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत स्वराज फाउंडेशन व सांसा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २७ मार्च या कालावधीत शायनिंग महाराष्ट्र २०२२ हे भव्यदिव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खुले राहणार असून या विशेष प्रदर्शनास केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री, नेते, उद्योगपती, अधिकारी, संशोधक, डॉक्टर्स,  इंजिनियर, नामांकित वकील व इतर प्रतिष्ठित मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असेल. त्यामुळे फलटणकरांसाठी ही बहुमूल्य देणगी असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांन निदर्शनास आणून दिले आहे.

    केंद्रीय मंत्रालयातील सर्व सहभागीविभागाकडून लाईव्ह प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी विभाग, संरक्षण विभाग, अंतराळ विभाग, अक्षय ऊर्जा विभाग व इतर सर्व विभाग सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्रालयांतर्गत १०० हून अधिक विभागांचा या प्रदर्शनामध्ये सहभाग असेल असे सांगण्यात आले आहे.  संशोधन, शेती, सेवा, उद्योग, व्यवसाय वगैरे अनेक क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी प्रदर्शनास आवर्जून भेट द्या, असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    खादी आणि ग्रामोद्योग विकास अंतर्गत खादी, दोर, ताग, पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) हातमाग आणि ग्रामीण कारागीरांची हस्तकला यांचाही या प्रदर्शनामध्ये सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर स्पर्धा (Quiz Competion) आयोजित केली जाणार असून विजयी व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

    शाळेतील विद्यार्थी घेऊन येणाऱ्या सर्व शाला प्रमुखांचा, शिक्षकांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व गोरगरीब जनता, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ मंडळींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती या प्रदर्शनामध्ये प्राप्त होणार आहे.

    केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी शायनिंग महाराष्ट्र २०२२ च्या भव्य प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी व लाभ घ्यावा, असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments