Breaking News

दिगंबर आगवणे यांचे आमरण उपोषण मागे ; ८ मागण्या मान्य

पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी आश्वासनाचे पत्र दिगंबर आगवणे यांना दिले. 
Digambar Aagavane's fast unto death is back

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : मी केलेल्या १६ मागण्यांपैकी आठ मागण्या मान्य झालेले आहेत व उर्वरित मागण्या या खासदार रणजीतसिंह यांच्या संबंधित असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण करत आहे. तपासाअंती निष्पन्न होणाऱ्या बाबीसंबंधी संबंधीतांवर उचित कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मला पोलीस प्रशासनाने दिले आहे. तसेच कारखान्याच्या दुषीत पाण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत चौकशीचे लेखी आश्वासन मला महसूल प्रशासनाने दिले आहेत, त्यामुळे मी माझे उपोषण मागे घेत असल्याचे दिगंबर आगवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

    प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दिगंबर आगवणे यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या हस्ते सरबत घेऊन दि. २३ मार्च पासून येथील अधिकार गृह इमारती समोर सुरु असलेले आमरण उपोषण मंगळवार दि.२९ मार्च रोजी मागे घेतले आहे.

 स्वराज साखर कारखान्याच्या दुषीत पाण्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी दुषीत झाले असून त्याभागातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार आगवणे यांनी केली आहे. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करुन योग्य कार्यवाहीचे पत्र महसूल प्रशासनाने दिले आहे.

    खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या संस्थांवर आर्थिक फसवणुकीचे आरोप करीत दिगंबर आगवणे यांनी दि. २३ मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले होते, दरम्यान दि. २४ रोजी त्यांचा रक्तदाब वाढल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पोलीस यंत्रणेने आगवणे यांचा विरोध डावलून त्यांना सातारा सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल केले होते, परंतू  त्यांनी पुन्हा उपोषण स्थळी येत उपोषण सुरु केले होते.

    मंगळवार दि. २९ मार्च पोलीस व महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आगवणे यांनी उपोषण मागे घेताना उपोषण स्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला लढा न्याय मिळेपर्यंत सुरु राहणार असून गेल्या १०/१५ वर्षात आपले व आपल्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, त्याला जबाबदार असणाऱ्यांना आपण सोडणार नाही, तथापी प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर उचित कायदेशीर कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्याने त्यावर विश्वास ठेवून आपण चौकशी होईपर्यंत थांबणार आहोत, तथापी हा लढा न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही अशी स्पष्टोक्ती यावेळी दिगंबर आगवणे यांनी व्यक्त केली आहे.

No comments