Breaking News

आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता निवासी पुराव्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य ; शिक्षण संचालनालयाची माहिती

Nationalized bank passbook valid for RTE 25% admission for residential proof

    मुंबई - शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज दिनांक 1 फेब्रुवारीपासून भरता येणार आहे. अर्ज करताना निवासी पुराव्यातील गॅस बुकचा पुरावा रद्द करण्यात आला असून राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

    बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1)(सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन 2022-23 या वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून या शैक्षणिक वर्षापासून निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/ टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/ घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तर, निवासी पुराव्याकरिता राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक देखील ग्राह्य धरले जाणार आहे.

    ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य असतील/ अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तथापि भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षांचा असावा, असेही शिक्षण संचालक (प्राथमिक) महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments