ढवळ येथील बैलगाडी शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून उध्वस्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ ऑक्टोबर - ढवळ गावच्या हद्दीत असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचा ट्रॅक जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करून, ट्रॅक वर मोठे खड्डे तयार करून बैलगाडी शर्यतीस फलटण ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी आज सलग दुसऱ्या रविवारी बैलगाडी शर्यतीचा ट्रॅक उध्वस्त केला आहे, मागील रविवारी राजुरी येथील बैलगाडी शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आला होता.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, ढवळ गावांमध्ये बैलगाड्या शर्यतीचे आयोजन होत असल्याची खबर फलटण ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी आज रविवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी या ठिकाणी छापे टाकले. परंतु याठिकाणी बैलगाड्या बैल किंवा माणसे आढळून आली नाहीत, मात्र बैलगाड्या शर्यत ट्रॅक आढळून आला. या ठिकाणी असणारे बैलगाडी शर्यतीचे ट्रॅक जेसीबीच्या साहाय्याने फलटण ग्रामीण पोलीसांनी उध्वस्त केले असून, जागोजागी मोठे खड्डे पाडून, त्यात जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकली आहेत जेणे करून बैलगाड्या शर्यतीला प्रतिबंध होईल.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक धनयकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे, शिंदे, राऊत, जगदाळे, कुंभार, तुपे, जाधव, पाटोळे, कदम मॅडम आणि पेंदाम मॅडम यांनी केली आहे.
No comments