Breaking News

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना लवकरच अग्रणी कारखाना म्हणून लौकिक प्राप्त करेल - आ. जयकुमार गोरे

Loknete Hindurao Naik Nimbalkar Sugar Factory launches crushing season

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ 

निवडणुकीत विरोधकांना पळता भुई थोडी करून सर्व सत्तास्थाने काबीज करणार - रणजितसिंह 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  – लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना आपल्या अनेक अडचणीवर मात करुन लवकरच अग्रणी साखर कारखाना म्हणून लौकिक प्राप्त करेल असा विश्वास  आमदार  जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. 

    लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या २०२१-२२ हंगामाच्या मोळी प्रदान कार्यक्रमानंतर आमदार जयकुमार गोरे बोलत होते.  यावेळी  सांगोला चे आमदार शहाजीबापु पाटील  व फलटणचे  जेष्ठनेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अ‍ॅड. जिजामाला नाईक निंबाळकर,  जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे,  तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, गटनेते अशोकराव जाधव , नगरसेवक अनुप शहा , युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, दहिवडी चे नगराध्यक्ष धनाजी जाधव , माजी अध्यक्ष अतुल जाधव, यूवा नेते सिध्दार्थ गुदगे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. 

    यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी, साखर कारखान्याच्या आगोदर स्वराज दूध डेअरीच्या उभारणीपासून खासदार रणजितसिंह यांच्या नियोजनबद्ध प्रगतीची माहिती दिली. जिद्द, चिकाटी व झोकून काम करण्याच्या क्षमतेमुळे भविष्यात रणजीतसिंह फार मोठे उद्योजक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर अ‍ॅड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या मध्ये आणखी नवीन उद्योग, व्यवसाय किंवा कारखाने चालवण्याची त्यांची क्षमता असून, दादांच्या उत्तुंग भरारीत त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. अहोरात्र झटून, झपाट्याने कामाचा निपटारा करण्याचे कसब त्यांच्या ठायी आहे. दादांच्या राजकीय प्रगतीत अ‍ॅड जिजामाला यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

    महाराष्ट्रासह दिल्लीच्या राजकारणात ही रणजीतदादा अग्रणी राहण्याचे संकेत देवून शहाजीबापु पाटील  यांनीही खासदार रणजितसिंहाच्या कामकाज कौशल्याचे अनेक किस्से कथन केले. रणजितदादा यांच्यात विरोधकांवर मात करून विजयश्री खेचून आणण्याचे कसब फार मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण सहकार्यासह विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

    फलटणचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनीही लोकनेते हिंदुराव यांच्यापासून ते आज रणजीतदादांच्या राजकारण, प्रगतीचे अनेक प्रसंग विशद करून रणजीतदादाना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

    याप्रसंगी खासदार रणजीतसिंह यांनी, कारखाना अडचणीत आणण्यासाठी काही निरुद्योगी मंडळींनी केलेल्या उठाठेवीचे किस्से सांगितले. आपली पत्नी जिजामाला यांच्या समर्थ साथीच्या जोरावर आणखीन ही कारखानदारी उभी करता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. येत्या नगरपालिका व पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांना पळता भुई थोडी करून सर्व सत्तास्थाने काबीज करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आपल्या राजकीय प्रगतीमधील योगदानाबद्दल आ. शहाजीबापू आ. जयकुमार गोरे व प्रल्हादराव पाटील यांचेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यातील सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली. याकार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अनुप शहा यांनी केले. याप्रसंगी जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी ही येत्या निवडणुकीचा आढावा घेऊन विजयश्री खेचण्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

No comments