पांडुरंग गुंजवटे यांनी हिम्मत असेल तर मलठण मधून निवडुन येऊन दाखवावे - अशोक जाधव
पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक अशोक जाधव समवेत सचिन अहिवळे, नितीन जगताप |
If Pandurang Gunjwate has the courage, he should be elected from Malthan - Ashok Jadhav
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ ऑक्टोबर - मी तोंडावर आपटलो म्हणणाऱ्या, पांडुरंग गुंजवटे यांची लायकी काय आहे, हे श्रीमंत संजीवराजे व मलठणकर नागरिकांना माहित आहे, निवडणुकीत श्रीमंत संजीवराजे ज्यावेळी गुंजवटे यांच्यासमवेत मलठणमध्ये प्रचारासाठी येतात, त्यावेळी श्रीमंत संजीवराजे यांना मलठणकर नागरिक घरात बोलवतात, औक्षण करतात पण पांडुरंग गुंजवटे यांना बाहेर उभे करतात, पांडुरंग गुंजवटे यांना उंबऱ्याच्या आत बोलवत नाहीत, अशी आवस्था पांडुरंग गुंजवटे यांची आहे. पांडुरंग गुंजवटे यांनी, हिम्मत असेल तर मलठण मधून निवडुन येऊन दाखवावे, मग त्यांना कळेल, कोण तोंडावर पडते ते, अशी घणाघाती टीका फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षाचे गटनेते अशोक जाधव यांनी केली.
भुयारी गटार योजना संदर्भातील निकृष्ट कामा विषयी अशोक जाधव यांनी केलेल्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक अशोक जाधव बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक सचिन अहिवळे, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष नितीन जगताप हे उपस्थित होते.
पुढे बोलताना अशोक जाधव म्हणाले की, फलटण नगर परिषदेत भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामा संदर्भात, आम्ही हायकोर्टात गेलो होतो, हायकोर्टाने जिल्हाधिकारी सातारा यांना आदेश दिले की, या कामाची तपासणी होऊन निकाल देण्यात यावा, परंतु सातारा जिल्हाधिकारी यांनी मला म्हणजेच तक्रारदाराला कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता, मी उपस्थित नसताना, एकतर्फी निकाल दिला आहे. जो मला मान्य नाही. सदरचा निकाल हा जिल्हाधिकाऱ्यांनी दबावापोटी दिलेला मॅनेज निकाल आहे. सातारा जिल्हाधिकारी यांनी, मला माझी बाजू मांडायची कोणतीही संधी न दिल्याने, आम्ही जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे नगरसेवक अशोक जाधव यांनी सांगितले.
मलठणच्या नागरिकांनी स्वामी समर्थ मंदिराजवळ पोलीस चौकी व्हावी अशी मागणी केली होती, परंतु पांडुरंग गुंजवटे यांनी ही मागणी फेटाळून जिंती चौक येथे, पोलीस चौकी करण्याची मागणी केली. पांडुरंग गुंजवटे यांना मलठणच्या नागरिकांची काही घेणे देणे नाही, त्यांना फक्त स्वतःची पोळी व स्वतःचे उत्पन्न वाढवणे एवढेच माहित आहे. त्यामुळेच पोलीस चौकी जिंती नाका येथे करण्याची मागणीला आम्ही विरोध करून, पोलीस चौकी स्वामी समर्थ मंदिर येथे व्हावी अशी मागणी केली होती आणि लवकरच पोलीस चौकी स्वामी समर्थ मंदिर येथे सुरू होईल अशी माहिती अशोक जाधव यांनी दिली.
No comments