Breaking News

२० गुन्ह्यात वॉन्टेड असणारी डी.पी. चोर टोळी जेरबंद ; ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

D.P. Thief gang arrested ; Outstanding performance of Phaltan Rural Police

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व शेतकऱ्यांना नुकसान पोहचविणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर (डी. पी.) चोरीचे १६, इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ०३ व लोणंद येथील मोटार सायकल चोरीचा ०१ असे एकूण २० गुन्ह्यात वॉन्टेड असलेली टोळी पकडून गुन्हे उघडकीस आणून, त्यामध्ये एकुण ३,४०,०००/- रु. चा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त करून चोरीचा माल घेणाऱ्यासह एकुण ०३ जणांना जेरबंद केले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत म. रा. वि. वि. कंपनीचे इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीने डोके वर काढले होते. इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा  अजय कुमार बंसल यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बरडे, व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील, एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथक वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना आरोपी १) अक्षय विजय भोसले वय २४ वर्ष, रा. साठेफाटा, ता. फलटण, जि. सातारा २) अशोक बापुराव चव्हाण वय २७ वर्ष, रा. खटकेवस्ती, ता. फलटण, जि. सातारा व इतर दोन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून वरील संशयितांपैकी अक्षय विजय भोसले व अशोक बापुराव चव्हाण यांना साठेफाटा, ता. फलटण, जि. सातारा येथुन ताब्यात घेण्यात आले होते.

    दि. १२/१०/२०२१ रोजी त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे वरील प्रकारच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्यांचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्यामध्ये इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरलेल्या एकुण १६ गुन्ह्यांची व शेतीसाठी विहीर/नदीवर बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल विलास कृष्णा भगवे वय ४१ वर्ष, रा. विझोरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास विकल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुमारे २,९०,०००/- रु. किंमतीची कॉपर वायर व आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली ५०,०००/- रु. किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

    सदरची मोटार सायकल ही आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींच्या परागंदा झालेल्या इतर दोन साथीदारांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक  अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पो. हवा, दत्तात्रय कदम, पो. हवा. रामदास लिमण, पो. हवा. अमोल कर्णे, पो.हवा. मोहन हांगे, पो. हवा. अशोक टिळेकर, म.पो.हवा. उर्मिला पेंदाम, पो. ना. सहदेव तुपे, पो. ना. अभिजित काशिद, पो. ना. वैभव सूर्यवंशी, पो. ना. हरिदास धराडे, पो. कॉ. महेश जगदाळे, पो. कॉ. विक्रम कुंभार, पो. कॉ. सचिन पाटोळे, पो. कॉ. गणेश अवघडे यांनी केली आहे.

No comments