Breaking News

बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत कार्यक्रम सादर करण्यास मान्यता ; नियमावली जाहीर

Approval to present events in enclosed halls and open spaces; Rules announced

    मुंबई - : कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

    बंदिस्त सभागृहे तसेच मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असणार आहे. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये याची काळजी घेण्यात यावी. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फुट) आवश्यक असेल. याशिवाय बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.

    बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.

    सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखाने व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक असेल. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करणे गरजेचे आहे. कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माईक / प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वतःचीच साधनसामुग्री वापरावी. बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.

    बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास परवानगी नसेल. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा स्पर्शरहित पद्धतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे. श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावी.जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड-19 च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. खाद्य व पेय पदार्थाच्या क्षेत्रामध्ये शक्य असेल तेथे तेथे अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्टया (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थाची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.

    आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वे जारी बंदिस्त सभागृहात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील. ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे, असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी "आरोग्य सेतू" अॅपचा वापर करावा. सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्या असणाऱ्या आजाराच्या तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावे.

बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रमांसाठीची नियमावली

    मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6 - 6 फुटांवर खुणा करून त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील / उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी 6 फुट अंतरावर असावेत. कार्यक्रम / कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य


राहील.बालकलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्यावारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थाचे / द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत, व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश द्यावा.

     गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात. अनियंत्रित गर्दी न रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील. कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, राजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. “माझे कुटुंब माझी जबाबदारी" ला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत.

    याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन ) / सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून Break the Chain अंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटकोर पालन करणे बंधनकारक आहे. स्थानिक कोविड-19 साथरोग परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करुन उपरोक्त निर्बंधामध्ये वाढ करु शकतील.

No comments