Breaking News

अधिकार्‍यांची साथ आणि पत्रकारांचे सहकार्य लाभल्याने तणाव विरहित काम करता आले - युवराज पाटील ; बदलीनिमित्ताने फलटणच्या पत्रकारांनी दिला भावपूर्ण निरोप

युवराज पाटील यांचा सत्कार करताना रविंद्र बेडकिहाळ. सोबत अरविंद मेहता, किरण बोळे, अ‍ॅड.रोहित अहिवळे, प्रदीप चव्हाण, विशाल शहा, बापूराव जगताप

With the help of officials and positive co-operation of journalists, we were able to work without stress in the district: Yuvraj Patil

बदलीनिमित्ताने फलटणच्या पत्रकारांनी दिला भावपूर्ण निरोप

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.10 सप्टेंबर - सातारा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात दोन सार्वत्रिक निवडणूका, दोनदा पूरपरिस्थिती, सातारा पूर्व भागातील दुष्काळ आणि गेल्या दोन वर्षांपासूनचा कोरोना अशा आव्हानात्मक काळात काम काम करावे लागले. हे करत असताना जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांची मोलाची साथ  आणि पत्रकारांचे सकारात्मक सहकार्य लाभल्याने जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करताना सातारा जिल्ह्यासारख्या अत्यंत जागृत जिल्ह्यात कोणताही ताण न घेता काम करता आले, अशा भावना सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केल्या.

    सातारचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची लातूर येथे बदली झाल्याच्यानिमित्ताने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी,  महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाच्यावतीने फलटण येथील कार्यालयात आयोजित छोटेखानी निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार किरण बोळे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक अ‍ॅड.रोहित अहिवळे, प्रशासकीय संचालक अमर शेंडे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सचिव रोहित वाकडे, सदस्य प्रसन्न रुद्रभटे, प्रदीप चव्हाण, मयुर देशपांडे, भारद्वाज बेडकिहाळ, सचिन तारळकर उपस्थित होते.

    शासकीय नोकरीत बदली होणे ही एक अपरिहार्य गोष्ट असते. नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्याचा चेहरा समजायला थोडा वेळ जातो. पण सातार्‍याच्या बाबतीतलं नातं भावनिक होतं. या ठिकाणी चार वर्षे सेवा करण्याचा मिळालेला काळ अपुरा पडल्याची भावना मनात आहे. शिवाय गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे अनेक संकल्पित कामे करता आली नाहीत याची खंतही असल्याचे सांगून पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात फलटणला एक वेगळे महत्त्व आहे. फलटणच्या पत्रकारांचेही आपल्याला  येथील कार्यकाळात उत्तम सहकार्य लाभले आहे. बदलीमुळे मी जरी अन्यत्र जात असलो तरी आपणा सर्वांच्या संपर्कात कायम राहीन, असेही पाटील यांनी नमूद करुन उपस्थितांना धन्यवाद दिले.

    रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, युवराज पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला गेली चार वर्षे अभ्यासू व कर्तव्यनिष्ठ जिल्हा माहिती अधिकारी लाभले. ते शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी भारती विद्यापीठ येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असल्यापासून त्यांच्याशी आपला स्नेह आहे. नेहमीच प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करण्याची वृत्ती असल्याने त्यांचे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांशी मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळेच त्यांच्या बदलीमुळे आपल्या सर्वांना वाईट वाटत आहे. मात्र जन्मभूमी लातूर येथे पुढील सेवेसाठी रुजू होत असल्याने ते विशेष आनंदित असल्याचे सांगून, सातारा या कर्मभूमीत काम करत असताना जन्मभूमीप्रमाणेच मोठ्या तळमळीने त्यांनी येथे काम केले हे विशेष उल्लेखनीय आहे. आत्ता बदलीमुळे ते इथून जात असले तरी पुन्हा एकदा पदोन्नतीने त्यांनी सातारा जिल्ह्यात लवकरच यावे, अशी सदिच्छाही बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

    अरविंद मेहता म्हणाले, अतिवृष्टी, पूर, कोरोना अशा आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आपली सेवा बजावली. विशेष म्हणजे कोरोनाच्या भिषण परिस्थितीत शासन आणि पत्रकार यांच्यातील मुख्य दुवा म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सातारा जिल्हा माहिती अधिकारी या पदाबरोबरच पुणे जिल्हा माहिती अधिकारी व पुणे विभागीय उपसंचालक या दोन अतिरिक्त पदांची जबाबदारीही त्यांनी कुशलतेने पार पाडली. राज्यशासनातर्फे पत्रकारांना विविध सोयी सवलती देण्याबाबतसुद्धा त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी व पत्रकार संघटनांशी उत्तम समन्वय साधला होता असे सांगून त्यांचे मार्गदर्शन इथून पुढेही सर्वांना मिळावे अशी अपेक्षाही मेहता यांनी व्यक्त केली.

    यावेळी उपस्थित सर्व संपादक व पत्रकारांनी युवराज पाटील यांचा यथोचित सत्कार केला.

No comments