विडणी येथील प्रगतशील शेतकरी शरद आदलिंगे यांना बारमाही शेतीतून भरघोस उत्पन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय पुणे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम सन 2021 22 या अंतर्गत कृषिदूत अमीर सिकंदर डांगे आणि कृषिदूत शिवम राजेंद्र लंगुटे यांनी फलटण तालुक्यामधील विडणी गावातील, ग्रुप फार्मिंग करिता प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत ए ग्रेड प्रमाणपत्र तसेच शेतीविषयक अनेक पुरस्कार मिळालेले प्रगतशील शेतकरी शरद बाबासो आदलिंगे यांची माहिती घेतली.
प्रगतशील शेतकरी शरद बाबासाहेब आदलिंगे हे आसपासच्या परिसरात त्यांच्या वांग्याच्या उत्पन्नामुळे प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या एकूण पाच एकर क्षेत्रापैकी फक्त एक ते दोन एकरावर ती वांग्याची शेती करतात व यातूनच त्यांना उत्तम गुणवत्ता युक्त उत्पन्न मिळते व त्याला जवळपास ते 80 ते 100 रुपये किलो या दराने विकतात, तरीही त्यांच्या वांग्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतका चांगला दर कसं मिळतो असे विचारले असता, ते सांगतात ते वांग्याची दोन किंवा तीन टप्पा पद्धतीने शेती करतात, म्हणजेच एक वांगे तोडणीला येईपर्यंत दुसऱ्या वांग्याची रोपे लावून तयार असतात व या कारणाने ते सांगतात की जर वांग्याची शेती बाराही महिने केली तर जो वर्षातून एक ते दोन महिने दर मिळतो तो आपल्याला हमखास मिळतोच.
ते सांगतात जितका जास्त आपण सेंद्रिय किंवा जैविक खतांचा वापर करू तितका टवटवीतपणा टिकून राहतो. ते सांगतात रासायनिक खतांना माझा विरोध नाही पण शक्य होईल तितका जैविक खतांचा वापर वाढवला पाहिजे. त्यामुळे वांग्याच्या गुणवत्तेत वाढ होते.
दोन ते तीन टप्पा वांगे लागवड पद्धतीच्या वापरामुळे त्यांना वर्षांमध्ये एक ते दोन महिने वांग्यांना उत्तम असा भाव हमखास मिळतो, त्यांचे ठाम म्हणणे आहे की जर वर्षभर एकाच भाजीपाला पिकाची शेती केली तर वर्षात थोड्या काळासाठी का होईना मिळणारा चांगला दर हा हमखास नफा मिळवून देतो.
पहिल्यापासूनच शेतीबद्दलची आवड व विविध माध्यमांमधून माहिती घेण्याची सवय यामुळे विविध कामे व्यवसाय करत असतानाही शेतीवर लक्ष केंद्रित होते त्यांना गहू, मका, वांगे, ऊस या चार पिकांविषयी खूप जवळीक वाटते व या चार पिकांविषयी त्यांना खूप ज्ञान आहे. या ज्ञानाच्या जोरावरच औरंगाबाद मधील नामवंत कंपनीद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर संघटित शेती म्हणजेच ग्रुप फार्मिंग करिता प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत ए ग्रेड प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याच बरोबर मका या पिकाचे सुद्धा त्यांना पारितोषिक मिळाले आहे.
No comments