Breaking News

शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवकांची तयारी; सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा

Preparation of youth in the state for the World Skills Championship to be held in Shanghai; The biggest skills competition

जिल्हास्तरीय स्पर्धेत २० हजार ०९० युवक, युवतींचा सहभाग ; राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार २६३ उमेदवार

    मुंबई  : शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवक-युवतींची तयारी करुन घेण्यात येत आहे. यासाठी राज्यात आयोजित स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हजार ०९० जणांनी यात सहभाग घेतला. जिल्हा आणि विभागीय स्तरावर यांची स्पर्धा संपन्न झाली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये २६३ उमेदवार सहभागी होत आहेत. तरुणांधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी इंडिया स्किल्स महाराष्ट्र २०२१ ही सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा असून राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

    मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते.

    प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, लँडस्केप गार्डनिंग, इंडस्ट्रियल कंट्रोल, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयटी, अॅग्रीकल्चर, फ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी ४५ कौशल्य श्रेणींमध्ये ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कुर्ला, मुंबई येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. तर रविवार ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लोअर परेल, मुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येथे राज्यस्तरीय चॅम्पियन्सना रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

    या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.

    स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०१८ मध्ये झालेल्या राज्य कौशल्य स्पर्धेच्या तुलनेत यंदाची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त आहे. स्पर्धेचे नियोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले. लेव्हल १ ची स्पर्धा जिल्हास्तरावर १७ ऑगस्टपासून संपन्न झाली. ही फेरी सर्व जिल्ह्यांतील विविध आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर २६३ उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहेत. हे अंतिम स्पर्धक आता राज्यस्तरीय अंतिम फेरीत ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवर स्पर्धेत सहभाग घेतील.

    महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास १०० विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स २०२१ विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर २०२१ मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स २०२१ मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केली जाते. वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनलची पुढील आवृत्ती ऑक्टोबर २०२२ मध्ये चीनच्या शांघाय येथे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये ६० हून अधिक देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

    यापुर्वी रशियाच्या काझान येथे आयोजित वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल २०१९ स्पर्धेमध्ये भारतीय संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून तेराव्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवक, युवतींना संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

No comments