Breaking News

सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना मराठी पत्रकार परिषदेतर्फे भावनिक निरोप

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा सत्कार करताना मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, तुषार भद्रे, राहुल तपासे, मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे, उपाध्यक्ष संग्राम निकाळजे, सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप.
Farewell ceremony to Satara District Information Officer Yuvraj Patil on behalf of Marathi Press Council

    सातारा -  सातारा जिल्ह्याचे कर्तबगार माहिती अधिकारी युवराज पाटील यांची लातुरला बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद व मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया यांच्यावतीने युवराज पाटील यांचा सहृद्य सत्कार आणि निरोप समारंभ जिल्हा माहिती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी माहिती अधिकारी युवराज पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, तुषार भद्रे, राहुल तपासे, मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे, उपाध्यक्ष संग्राम निकाळजे, सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

      मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, माहिती अधिकारी युवराज पाटील हे गेली चार वर्षे सातारा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी प्रशासकीय कामकाजाबरोबरच पत्रकारांनाही नेहमीच सहकार्याच्या भावनेने मदत करीत होते. त्यामुळेच त्यांच्यासारखा कर्तबगार माहिती अधिकार्‍याचा सत्कार करताना आम्हाला देखील आनंद होत आहे. त्यांनी प्रशासकीय आणि पत्रकारांमध्ये मध्यस्थाची भूमिका योग्यरित्या पार पाडून सातारच्या पत्रकारांना दिलेल्या सहकार्यामुळे त्यांची कायमच आठवण आम्हा पत्रकारांना राहील.

    सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांच्या कामकाजामध्ये अनेकदा वादाचे मुद्दे जरी आले असले तरी यामध्ये संवादच घडवून आणत त्यांनी पत्रकारांमधील आणि प्रशासनामधील दरी कमी करण्याचे नेहमीच कार्य केल्याने त्यांच्या इतका चांगला अनुभव इतर कोणत्याही माहिती अधिकार्‍याचा आम्हाला आला नाही. पत्रकारांशी समरसून वागणारा हा अधिकारी कायमच स्मरणात राहील. त्यामुळे अशा कर्तबगार अधिकार्‍याला सातार्‍यातून निरोप देताना आमच्याही भावना दाटून येत आहेत.

    निरोप समारंभाला उत्तर देताना युवराज पाटील हे भावनिक होवून त्यांना अश्रूही दाटून आले. ते म्हणाले, या माझ्या कार्यकाळामध्ये दुष्काळी परिस्थितीपासून कोरोना काळासारख्या आजारांची मोठी संकटे यशस्वीरित्या पेलताना सातारच्या पत्रकारांनी मला मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर सातारकरांनीदेखील माझ्यावर भरभरुन प्रेम केल्याने सातारा हे माझे नेहमीच हृदय सिंहासनी राहील, असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    याचबरोबर सातार्‍यातील ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, राहुल तपासे यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा देत माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे अनेक किस्से पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले. पत्रकारांशी माहिती अधिकारी म्हणून न राहता एक मित्र म्हणून त्यांनी जोडलेली नाळ सातारच्या पत्रकारितेच्या कायमच स्मरणात राहील, असे देखील गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

    या कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी विनित जवळकर, संजय कारंडे, विठ्ठल हेंद्रे, आदेश खताळ, विशाल पाटील, तबरेज बागवान, जावेद खान, अमोल निकम, रिजवान सय्यद, प्रतिक भद्रे तसेच माहिती कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व सातारा शहरातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे यांनी केले.

No comments