Breaking News

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

Care must be taken to reduce corona infection - Deputy Chief Minister Ajit Pawar

पुणे पिंपरी चिंचवड कॅन्टॉआनमेंट बोर्ड परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

    पुणे दि.17- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी खबरदारी म्हणून  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र तसेच तिन्ही कॅन्टॉन्मेंट क्षेत्रातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

    विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  खासदार सुप्रिया सुळे  यांच्यासह आमदार दिलीप मोहीते, ॲड अशोक पवार, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप,   विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

    श्री.पवार म्हणाले, रविवारी गणेश विसर्जनाचे दिवशी अत्यावश्यक सेवा, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्यात येतील. विसर्जनाचेवेळी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे. अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीदेखील कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून  प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने इतरही आजाराच्या रुग्णांवर योग्य उपचार होतील याकडे लक्ष देण्यात यावे. नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे  आणि त्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. दुसरा डोस घेतलेल्या जलतरण खेळाडूंना जलतरण तलावात सरावासाठी अनुमती देण्यात येईल.गणेश उत्सवानंतर  परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येतील, असेही श्री.पवार म्हणाले.

    यावेळी लोकप्रतिनिधी आणि कोविड कोअर ग्रुपच्या सदस्यांनी कोरोना संसर्ग कमी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून नागरिकांनी या पुढेही काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

    विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थीतीची माहिती दिली. यात जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा 92 लाखाचा टप्पा पार करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 18 लाख 80 हजार लसमात्रा देण्यात आल्या होत्या, तर सप्टेंर महिन्यात आतापर्यंत 11 लाख 20 हजार लसमात्रा देण्यात आल्या आहेत. मागील दोन आठवड्यात 5 वेळेस पुणे जिल्ह्याने 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. या आठवड्यात दंडात्मक कारवाईद्वारे 20 लाख 95 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मागील आठवडयात पुणे जिल्हयाचा बाधित रुग्णसंख्येचा दर 3.9 टक्के होता. पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रात धडक मोहिम अंतर्गत एकूण 4 लाख 30 हजार नमुना तपासणी पूर्ण केली आहे. गेल्या आठवड्यात मृत्यूदर कमी होऊन 0.9 टक्क्यापर्यंत आला असल्याचे त्यांनी सांगितले.

    बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, उपमहासंचालक यशदा डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments