पोंभुर्ले येथील ‘दर्पण’कारांच्या स्मारक विस्तारीकरणाचे काम त्वरीत सुरु करावे ; ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे निर्देश
![]() |
| मंत्रालयात आयोजित बैठकीप्रसंगी ना.हसन मुश्रीफ, ना.अदिती तटकरे, आमदार वैभव नाईक, रविंद्र बेडकिहाळ आदी. |
मुंबई : ‘‘पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) हे ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असल्याने हे गाव राज्यातील एक आदर्श गाव बनवण्यासाठी राज्यशासन ग्रामविकास विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्वरित आराखडा सादर करावा. तसेच या अंतर्गत बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे रु.50 लाखापर्यंतचे विस्तारीत कामही त्वरीत सुरु करावे’’, असे निर्देश ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी दिले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व पोंभुर्ले ग्रामपंचायत यांच्या विनंतीवरुन उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव व स्मारक विकासासाठी दि.5 जानेवारी 2021 रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनात एक विशेष उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी आवश्यक ती विकासकामे त्वरीत जिल्हा नियोजन समितीमधून करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासाठी रितसर शासनाच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूदही केली होती. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी आढावा घेण्यासाठी विशेष बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात (4 ऑगस्ट 2021) आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी वरील निर्देश दिले. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री ना.आदिती तटकरे, कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड.प्रसाद करंदीकर, पोंभुर्लेचे सरपंच सादीक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे, रोहित वाकडे, सदस्य भारद्वाज बेडकिहाळ, पत्रकार प्रसन्न रुद्रभटे यांच्यासह ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम व माहिती व जनसंपर्क विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ना.आदिती तटकरे म्हणाल्या, ‘‘पोंभुर्ले हे बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव म्हणून विकसित करताना ते एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्यासाठी लौकरच पर्यटन विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेवून पर्यटन आराखडा तयार केला जाईल. ‘दर्पण’कारांंचे स्मारक विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रितपणे सकारात्मक कार्यवाही करतील. पर्यटकांच्या व अभ्यासकांची पसंती कायमच या स्थळाला आहे. ठोस व साजेशी अशी स्मारकाची वास्तू असावी यासाठी जिल्हा परिषदेने नव्याने अंदाजपत्रक सादर करावे’’, असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पाचे संकल्पक रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक करुन स्मारकाचे विस्तारित काम व ‘दर्पण’ सभागृहाचे सुशोभीकरण याबाबत आपल्या कल्पना सांगितल्या. तसेच यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड.प्रसाद करंदीकर, पोंभुर्लेेचे सरपंच सादिक डोंगरकर यांनी या विस्तारीकरण कामासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सहकार्याचे आश्वासन दिले. तसेच स्मारक प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आम्ही ग्रामस्थ एक एकर जागा देवू असेही नमूद केले. यावर ना.हसन मुश्रीफ यांनी याचे स्वागत करुन, ‘‘सदर जागा पोंभुर्ले ग्रामपंचायतीकडे वर्ग करा व एक एकर जागेवरील नियोजित नवीन स्मारकाचा आराखडा शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव करुन जिल्हा परिषदेमार्फत पाठवावा. त्यासाठीही आपण स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देऊ’’, असे स्पष्ट केले.
बैठकीनंतर रविंद्र बेडकिहाळ लिखीत ‘आठवणीतले पतंगराव’ व अमर शेंडे लिखीत ‘बाळशास्त्री’ ही पुस्तके ना.हसन मुश्रीफ व ना.अदिती तटकरे यांना देण्यात आली.

No comments