Breaking News

होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

State Government is positive about the demands of homeopathic medical professionals - Health Minister Rajesh Tope

    मुंबई - : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

    मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या  मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, आयुष संचालक डॉ.कोहली, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे, विद्यापीठाच्या विद्या परीक्षेचे सदास्य डॉ. बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

    शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सां‍गितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र.108) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

    सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी,राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोदिनी पागे,डॉ. बाळकृष्ण गायकवाड, परिषदेचे रजिस्ट्रार वैद्य सोनमांकार आदी उपस्थित होते.

No comments