मोहरम निमित्त सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
सातारा दि.18 (जिमाका): राज्यातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाचा विचार करता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने 19 ऑगस्ट 2021 रोजी पाळण्यात येणारा मोहरम अत्यंत साधेपणाने पाळण्याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केल्या आहेत.
जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट राजी कत्ल की रात तसेच 10 व्या दिवशी योम-ए-आशुरा हे दिनांक 19 ऑगस्ट रोजी असून त्या निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात, परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नाहीत.
कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावे. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये.
वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
कोविड-19 च्या अनुषंगाने शासन, स्थानिक प्रशासन व या कार्यालयाकडून केलेले आदेश व निर्बंध सातारा जिल्ह्यात कायम राहतील. त्यामध्ये मोहरम निमित्ताने कोणतीही शिथिलता देता येणार नाही. मोहरमच्या मधल्या कालावधीत शासनस्तावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
No comments