Breaking News

रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात ३६०९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर : उत्तम काम करणाऱ्या सर्व घटकांचा यथोचीत सत्कार

डेमो घरकुलाचे  (प्रतिकृतीचे) उदघाटन प्रसंगी आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात व इतर 

Homes sanctioned to 3609 beneficiaries in Ramai and Pradhan Mantri Awas Yojana in the Phaltan taluka

     फलटण -: शासनाच्या रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले प्रयत्न व लाभार्थ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल संबंधीतांना धन्यवाद देत तालुक्यात या दोन्ही योजना प्रभावीरीतीने राबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ज्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या ग्रामपंचायत सरपंच,ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

     फलटण पंचायत समिती सभागृहात महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती, लाभार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार, स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले, तसेच पंचायत समिती कार्यालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलाचे  (प्रतिकृतीचे) उदघाटन आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले,  त्यानंतर मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. दिपकराव चव्हाण होते. पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, सदस्य सौ. रेश्मा भोसले, सचिन रणवरे, संजय कापसे, विश्वासदादा गावडे, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक गुळवे, खाते प्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, लाभार्थी उपस्थित होते.

     सातारा जिल्ह्यात सर्वोत्तम डेमो घरकुल (प्रतिकृती) फलटण पंचायत समितीने उभारल्याचे आवर्जून सांगत उत्कृष्ट दर्जाचे बांधकामाबद्दल गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार व बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एम. गरुड, शाखा अभियंता डी. ए. बिराजदार यांचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

     घरकुलांसाठी ग्रामपंचायतींनी शासकीय व गावठाणातील जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना योग्य मदत करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करीत प्रधान मंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल  हनुमंतवाडी, मुंजवडी, तरडगाव, ढवळ या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना पुरस्कार देवून त्यांचा यथोचित गौरव आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

     दि. २० नोव्हेंबर २०२० ते दि. ५ जून २०२१ या महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी खाते प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून एक दिवस घरकुलांसाठी योजनेंतर्गत प्रत्यक्ष लाभार्थींच्या भेटी घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, ग्रामपंचायत स्तरावर सदर लाभार्थींचे मेळावे आयोजित करुन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी नोडल अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी विनायक गुळवे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

    घरकुलासाठी एक गुंठा जागेचा दस्त नोंदणीसाठी आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या पूर्व परवानगीने तालुक्यात प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत एकूण ६० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

  पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

     रमाई आवास योजनेंतर्गत फलटण तालुक्यात सन २०१६ - २०१७ ते सन २०१९ - २०२० या कालावधीत तालुक्यातील सर्व १२८ गावात ११५२ घरकुले मंजूर करण्यात आली त्यापैकी ८६२ पूर्ण झाली आहेत तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व १२८ गावात २४५७ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी १५३० पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments