Along with government agencies, private hospitals also contribute a lot to corona treatment - Ramraje Naik Nimbalkar
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्र गेल्या सुमारे २ वर्षाहुन अधिककाळ कोविड महामारीचा सामना करीत असताना शासकीय यंत्रणेबरोबर खाजगी हॉस्पिटल व डॉक्टरांनी मोठी मेहनत घेतल्याबद्दल धन्यवाद देतानाच आता संभाव्य ३ ऱ्या लाटेत सर्वसामान्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यातील खाजगी हॉस्पिटल्स व डॉक्टरांना केले आहे.
समर्थनगर, औरंगाबाद येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) सभागृहात हॉस्पिटल वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय परिषदेच्या उदघाटन समारंभात ऑनलाइन मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, आ. रोहित पवार ऑनलाईन सहभागी झाले होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. जे. टी. पोळ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खाजगी हॉस्पिटलचे प्रश्न सोडविणार
राज्यातील खाजगी डॉक्टर्स व हॉस्पिटल चालकांच्या काही प्रश्नांबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे निश्चित योग्य मार्ग काढतील व खाजगी हॉस्पिटल्स व डॉक्टरांना योग्य न्याय मिळेल याची ग्वाही देत आपणही आपल्या सर्व प्रश्नांची माहिती घेतली असून त्याबाबत स्वतः लक्ष घालुन राज्य शासनाला या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत निर्देश देण्याचे आश्वासन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
खाजगी हॉस्पिटल्सच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार : राजेश टोपे
कोरोना व इतर आजारांच्या साथीमध्ये राज्यातील खाजगी डॉक्टरांचे योगदान मोठे असल्याचे नमूद करीत म. फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही त्रुटी रहात आहेत, किंवा काही बाबतीत अन्याय होत असल्याच्या आपल्या तक्रारी बाबत आपण सविस्तर माहिती घेतली आहे, त्याबाबत संबंधीत यंत्रणा व अन्य अधिकारी यांच्या कडून अधिक माहिती घेऊन शासन स्तरावर चर्चा करुन आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करुन निश्चित योग्य दिलासा देण्याचे स्पष्ट आश्वासन आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी या परिषदेत ऑनलाइन दिले.
सर्व आजारासाठी म. फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळावा : आ. रोहित पवार
शासकीय व खाजगी रुग्णालये यांच्या उपचाराची समानता लक्षात घेऊन खाजगी व शासकीय हॉस्पिटल्स मधील वैद्यकीय उपचाराचे दर समान असले पाहिजेत निर्धारित सर्व १२० आजाराची सुविधा दोन्ही ठीकाणी असली पाहिजे विषेशत: मोतीबिंदू, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, अपेडिक्स यासारखे उपचार या योजनेत समाविष्ट असले पाहिजेत अशी आग्रही भूमिका घेत त्याबाबत आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही देत आ. रोहित पवार यांनी खाजगी हॉस्पिटल व डॉक्टरांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे स्पष्ट आश्वासन देतानाच कोरोना उपचाराबाबत या सर्वांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील ३५० हॉस्पिटल्सची रजिस्टर्ड संघटना : डॉ. जे. टी. पोळ
हॉस्पिटल वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्रचे चेअरमन डॉ. जे. टी. पोळ यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात राज्यातील म. फुले जनआरोग्य योजना राबविणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर असलेली अनास्था दूर करुन या सर्वांना न्याय मिळवून देण्याबरोबर शासन यंत्रणेशी कायम स्वरुपी सुसंवाद राखण्यासाठी प्रामुख्याने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून पुणे येथे धर्मादाय आयुक्तांकडे संघटना नोंदणीकृत आहे. राज्यातील ३५० हॉस्पिटल या संघटनेचे सभासद असल्याचे निदर्शनास आणून दिले.
संपूर्ण राज्यात एकच दर प्रणाली असावी : डॉ. जे. टी. पोळ
राज्यात कोरोना उपचार करताना शासनाने शहरी, निमशहरी, ग्रामीण असे ABC विभागणी करुन उपचाराच्या दरामध्ये तफावत ठेवली आहे, वास्तविक उपचारासाठी येणारा खर्च, लागणारी औषधे व अन्य बाबी सर्वत्र सारख्याच असताना प्रतवारी रद्द करुन संपूर्ण राज्यात एकच दर प्रणाली असावी, शासनाने योजनेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक रुग्णालयात एक आरोग्य मित्र नियुक्त करुन रुग्णांना योजनेची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे मात्र हे कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित नसतात, आपल्याला योजनेचा फायदा जाणीवपूर्वक दिला गेला नसल्याच्या तक्रारीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने विविध रुग्णालयांची लक्षवधी रुपयांची बिले नाहक गुंतून पडतात, त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रीव्हन्स सेल (तक्रार निवारण समिती) स्थापन करण्याची मागणी करताना हॉस्पिटल मधील २५ % बेड योजनेतील रुग्णांसाठी प्राधान्याने देण्याची तरतूद असल्याने त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना सामावून घेतले जात नाही याची माहिती नसल्याने केल्या गेलेल्या तक्रारी निष्फळ असल्याने निकाली निघतात मात्र त्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने उपचाराची बिले अडकून राहणार नाहीत याची दक्षता घेतली जावी, वैद्यकीय उपचाराचे दर १० वर्षांपूर्वी निश्चित केले त्यावेळचे औषधे, वीज, स्टाफ पगार वगैरे खर्चात आज सुमारे ४/५ पट वाढ झाली असल्याने त्यामध्ये भरीव वाढ करण्याची मागणी करताना विमा कंपनीला त्यावेळी प्रति रुग्ण ३३३ रुपये दिला जात असलेला प्रीमियम ९९९ रुपये दिला जात असल्याचे यावेळी डॉ. जे. टी. पोळ यांनी निदर्शनास आणून दिले.
या बैठकीस राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य सर्वश्री डॉ. संजय कदम नांदेड, डॉ. बापू कांदेकर अहंमदनगर, डॉ. अनिल पाटील जळगाव, डॉ. हिमांशू गुप्ता औरंगाबाद, डॉ. बळीराम बागल जालना, डॉ. रमेश भोईटे बारामती, डॉ. राज नगरकर नाशिक, डॉ. राघोजी सोलापूर, डॉ. राहुल भांबरे धुळे, डॉ. विनायक गवळी पुणे, डॉ. अतुल फडे अकलुज आणि राज्याच्या विविध जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या सह सभासद हॉस्पिटल्स पैकी १२० हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments