Breaking News

कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता

Government approves preparation of Kuda Buddhist Caves Tourism Development Plan
    अलिबाग  (जिमाका):- कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कोकणात विकास कामांची गती वाढविणे यासाठी ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देऊन, पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावचा विकास करणे देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी कुडा बौध्द लेणी संवर्धनासाठी पाहणी करून पर्यटन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली होती.

    यावेळी पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यांच्यासह कुडा बौध्द लेणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत चर्चा केली होती. याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी तळा तालुक्यातील कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.
 
    या प्राचीन बौध्द लेणींचा पर्यटनांत समावेश करून येथील विकास करण्यात येणार आहे. या लेण्यांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

    रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द लेणीचा उल्लेख केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये कुडे प्राचीन बौद्ध लेण्यांची नोंद आपणास पहावयास मिळते. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लेण्यांची निर्मिती केली. येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे. या लेण्यांची नोंद इ.स.1848 मध्ये सापडली असून या लेण्या इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे या ठिकाणी आढळतात. भिक्षूंना राहण्यासाठी त्या काळात व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. गेली अनेक वर्षे नागरिकांकडून लेणीचा विकास करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी हा पाहणी दौरा केला होता.
 
    यावेळी लेणीचा विकास आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून अधिक चांगल्या पध्दतीने कसे करता येईल, या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत तळा पंचायत समिती सभापती देविका लासे, रा.जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, रा. जि.प. सदस्य बबन चाचले, नगरसेवक चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे, मोदाड ग्रा.पं. सरपंच तानाजी कालप माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार अण्णामा कनशेट्टी, गटविकास अधिकारी श्री. यादव, पोलीस निरीक्षक श्री. गैंगजे आदि मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला होता.

    तळा तालुक्यातील कुडा लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.

No comments