Breaking News

कोरोनाची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Deputy Chief Minister Ajit Pawar's directive to focus on building health facilities considering the possible wave of corona

बारामतीतील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा घेतला आढावा

    बारामती, दि. १५ : बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

    बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी. शासकीय व खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.  ‘म्युकरमायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचारासाठीच्या औषधांची  तसेच उपचाराकरिता लागणाऱ्या इतर काही साधनसामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात यावे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

    उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    या आढावा बैठकीपूर्वी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिज यांचे मार्फत महिला हॉस्पिटल बारामती रूग्णालयाला 2 टन क्षमतेचे 3 एअर कंडिशन्स व मेडीकल कॉलेज कोविड सेंटरला फेस शिल्ड, सर्जिकल हेड कॅप, सर्जिकल शू कव्हर, सर्जिकल मास्क, हॅण्ड ग्लोज, डिसपोजल ॲप्रान, हॅण्ड वॉश, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, वॉटर कूलर, ऑक्सिजन ट्रॉली इत्यादी साहित्य व वेंचर स्टीलचे रमाकांत पाडोळे यांच्या कडून 25 हजार रूपयांचा धनादेश देखील उपमुख्यमंत्री यांचे हस्ते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द केला.

No comments