Breaking News

राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

1.5 lakh metric tons of buffer stock of urea should be completed in 15 days - Agriculture Minister Dadaji Bhuse

खरीप हंगामासाठी खत पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा

    मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

    खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे.

    कंपन्यांनी खत पुरवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

    यावर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रीक टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रीक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरीया ५ लाख ३० हजार मेट्रीक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रीक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रीक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.

No comments