Breaking News

विडणी येथील महात्मा फुले एज्युकेशनच्या नियामक मंडळाच्या नियुक्त्या नामंजूर

Appointment of  Executive Board of Mahatma Phule Education at Vidani rejected

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 5 मार्च  2021 -  विडणी येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, विडणी ता. फलटण  या संस्थेच्या  कार्यकारी तथा नियामक मंडळाच्या नियुक्त्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग यांनी नामंजूर केल्या आहेत. संबंधित सचिवाने कार्यकारी तथा नियामक मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन ट्रस्टी सदस्य व पदाधिकार्‍यांची निवड केली. सदरचा बदल कायदेशीर होण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्यापुढे बदल अर्ज सादर केला होता. तो बदल अर्ज आयुक्तांनी नामंजूर केला आहे. दरम्यान काही विश्वस्त व ग्रामस्थांनी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांसह कार्यकारणीच्या कारभाराविरोधात व  भ्रष्टाचाराविरोधात सहायक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास, सातारा तसेच साहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा सातारा यांच्याकडे तक्रार केली आहे.

        महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी फलटण तर्फे सहदेव गणपतराव शेंडे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग यांच्यासमोर कार्यकारी तथा नियामक मंडळाची मुदत संपल्यामुळे 29 जुलै 2018 रोजी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2018  ते 31 मार्च 2021 या तीन वर्षे कालावधी करता विश्वस्तांची निवड केली होती, कार्यकारी तथा नियामक मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन ट्रस्टी सदस्य व पदाधिकार्‍यांची निवड केलेली आहे, सदरचा बदल न्यासाच्या परिशिष्ट एक वर नोंद होण्याकरिता धर्मादाय आयुक्त यांच्याकडे बदल अर्ज सादर केलेला होता. या बदल अर्जास  राजेंद्र संपतराव शिर्के, जगन्नाथ दामू पवार  सर्व रा. विडणी ता. फलटण यांनी हरकत घेतली होती. सदर प्रकरणावर आपले मत नोंदवताना सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी दोन्ही,  बाजूची कागद पुरावे व कथने तपासून महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी तर्फे सहदेव गणपतराव शेंडे यांनी केलेला बदल अर्ज नामंजूर केला आहे.  यापूर्वीही सहदेव शेंडे यांनी  नियामक मंडळाचा केलेला बदल परिशिष्ट 1 वर होण्याकरता सन 2015 मध्ये  एकूण 15 वेळा केलेले बदल अर्ज देखील या अगोदरच नामंजूर करण्यात आलेले आहेत.

        माजी आमदार चिमणराव कदम यांनी १९७१ साली महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत विडणी येथे उत्तरेश्वर हायस्कूल सुरू केले. १९९६ व २००४ या दरम्यान, दोन कार्यकारिणींनी संस्था चालवली. २००४ साली पूर्वीच्या सचिवांचा कार्यकारिणीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यातील एका व्यक्तीने अनाधिकृतपणे संस्थेचे सर्व रेकॉर्ड ताब्यात घेतले. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेताच या सचिवाने बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेचा कारभार हाकण्यास सुरुवात केली. यामध्ये या सचिवाने आर्थिक तडजोडी करुन शिक्षण विभागाच्या विविध आदेशांना हरताळ फासत शिक्षकांची नेमणूक व इतर गोष्टींतून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केली, तसेच कार्यकारी तथा नियामक मंडळाची मुदत संपल्या नंतर त्यामध्ये बदल केले.  ही बाब विश्वस्तांच्या निदर्शनास आल्यानंतर हनुमंत कृष्णा नरुटे, जगन्नाथ दामू पवार, विठ्ठल  कोंडीबा नाळे, राजेंद्र संपतराव शिर्के, रामदास बाजीराव गाढवे, आप्पाजी कृष्णाजी कोकरे, दिलीप नीळकंठ पवार, नंदकुमार दाजीराव जगताप, विठ्ठल सोनबा पवार, सुरेश नानासो शेंडे, नवनाथ नारायण पवार,  वैभव पोपट पवार  आदी विश्वस्त व ग्रामस्थांनी सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा तसेच धर्मादाय आयुक्त व शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

No comments