सैन्य दलातही महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतील - विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे
![]() |
पौर्णिमाचा सत्कार करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी डॉ. बाळासाहेब शेंडे, पांडुरंग गुंजवटे वगैरे |
फलटण : भारतीय सैन्य दल, वैमानिक, रेल्वे त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी म्हणून महिला अत्यंत उत्तम काम करीत असून कु. पौर्णिमा करणे या तरुणीने भारतीय सैन्य दलात काम करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सैन्य दलातही महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतील असा विश्वास व्यक्त करून, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कु. पौर्णिमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी कु. पौर्णिमा करणे हिने त्यांची भेट घेतली त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी कु. पौर्णिमाचा सत्कार करुन तिला शुभेच्छा दिल्या.
काळूबाईनगर, मलठण (फलटण) येथील कु. पौर्णिमा सुरेश करणे या विद्यार्थीनीची भारतीय सैन्य दलातील आसाम रायफल पॅरामिलिटरी फोर्स मध्ये निवड झाली असून या निवडीबद्दल तिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
इंडियन आर्मी पॅरामिलीटरी फोर्समध्ये मुलींना जनरल ड्युटीवर सैनिक म्हणून नियुक्तीस भारतीय सैन्य दलाने सुरुवात केली असून गत वर्षीपासून मुलींच्या निवडीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ तरुणांना सैन्य दलात संधी दिली जात असे मात्र आता तरुणींना संधी देण्यात येत असल्याने अन्य क्षेत्राप्रमाणे सैन्य दलातही तरुणी तरुणांच्या बरोबरीने कार्यरत राहुन आपले कर्तृत्व सिद्ध करतील असा विश्वास समाजातून व्यक्त होत आहे.
No comments