पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी जागा खरेदीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांना भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात अनेक दिवसांपासून मागणी असून याबाबत देवस्थान समितीने कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु. विकास बँकेच्या इमारत संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
ही इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मुख्य बस स्थानकाजवळ आहे. भाविकांसाठी कमी कालावधीत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही इमारत सोयीची होईल, असे देवस्थान समिती व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सहकारमंत्री श्री.पाटील म्हणाले, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. विधी व न्याय विभागाकडून यावर योग्य तो मार्ग काढून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, विधी व न्याय विभागाचे सहसचिव, संबधित अधिकारी उपस्थित होते.
No comments