फलटण - पुणे रेल्वेसेवाचा रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थित शुभारंभ होणार
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 11 फेब्रुवारी 2021 - फलटण रेल्वे चा प्रलंबित प्रश्न माजी खा. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मार्गी लागल्यानंतर, फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी, फलटण तालुक्यातील नागरिकांकडून होत होती. फलटण पुणे रेल्वेसेवे मुळे, शेती उत्पादन, व्यापारी यांच्यासाठी स्वस्त वाहतूक उपलब्ध होणार असून, नोकरदार व विद्यार्थी यांच्यासह इतर नागरिकांनाही या रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण ते पुणे रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या प्रयत्नांना आता यश आले असून, पुढील महिन्यात फलटण पुणे रेल्वे चा शुभारंभ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन, बहुचर्चित फलटण पुणे रेल्वेच्या शुभारंभासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावे यासाठी निमंत्रण दिले. रेल्वेमंत्री यांनी पुढील महिन्यात शुभारंभासाठी येतो असे आश्वासन दिले आहे.
गेली अनेक वर्ष झाली फलटण बारामती पंढरपूर या रेल्वेच्या प्रश्ना वर प्रयत्न सुरू होते परंतु माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर झाल्यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती आली सातत्याने रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्याबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामध्ये त्यांना यश आले गेल्या 1 वर्षापूर्वी फलटण लोणंद रेल्वे ट्रायल सुरू झाली, त्यामध्ये काही अडचणी आहेत का, याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या महिन्यामध्ये फलटण येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, फलटण पुणे रेल्वे रोज सुरू व्हावी यासाठी भूमिका घेतली. ही रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेच्या उत्पादनामध्ये भर पडणार आहे. तसेच फलटण माण खटाव माळशिरस या भागातून पुण्याकडे जाणारा शेतीमाल रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच विद्यार्थी व नोकरदार वर्ग यांनाही या रेल्वेसेवेचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही रेल्वे सुरू होणे खूप गरजेचे असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या व मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व पुढील महिन्यांमध्ये रेल्वेमंत्र्यांच्या शुभ हस्ते फलटण पुणे रेल्वे सुरू होणार अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
No comments