Breaking News

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जबाबदारीने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे– जिल्हाधिकारी शेखर सिंह

बहुमाध्यम रथाचे  फित कापून उद्घाटन करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह

Launch of Covid-19 Vaccination Multimedia Awareness Campaign in Satara District

 सातारा जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ


            सातारा , (जिमाका) दि. 26:- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सातारा जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण  सभागृहाच्या समोर करण्यात आली.
बहुमाध्यम रथास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह

    या बहुमाध्यम रथाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये , क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कोल्हापूरचे प्रमोद खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.

            उदघाटन प्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच  मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून आपली आणि समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.  या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर महादेव मनवकर आणि संच आणि शाहीर श्रीरंग रणदिवे आणि त्यांचा संच यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. “ लोकल फॅार व्होकल ” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य  कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे.  तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

            पुढील दहा दिवस  सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

No comments