Breaking News

राज्यातील पत्रकारांनी 20 फेब्रुवारी रोजी जयंतीदिनी बाळशास्त्रींना अभिवादन करावे; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे आवाहन

Journalists in the state should greet Balshastri on his birthday on February 20; Appeal of Maharashtra Journalist Welfare Fund

        फलटण - : राज्यातील सर्व पत्रकार, पत्रकार संघटनांनी शनिवार, दि.20 फेब्रुवारी रोजी आपापल्या कार्यालयात, सोयीच्या ठिकाणी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त त्यांना विशेष अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी केले आहे.

        याबाबतची सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत यादीत आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासनाने समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे केली होती. दि.5 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकी दरम्यान ना.अजितदादा पवार यांनी याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिलेले होते. त्यानुसार दि.11 फेब्रुवारी 2021 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या जपूती2020/प्र.क्र.95/29 च्या परिपत्रकामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात  20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिमेस शासकीय अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

        राज्यशासनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवी दिल्ली येथे प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्रातील समाजसुधारक’ या विशेष ग्रंथात जे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे रंगीत छायाचित्र मुद्रित केले होते तेच शासनाने अधिकृत छायाचित्र म्हणून या आदेशासोबत निर्देशित केले आहे. मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार सौ.चंद्रकला कुमार कदम यांनी विशेष परिश्रम घेवून हे छायाचित्र तयार केले आहे.

        मान्यवरांच्या शासकीय अभिवादन यादीत बाळशास्त्रींच्या नावाचा समावेश होण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा पाठपुरावा सातत्याने सुरु होता त्याला यश आले आहे. आता प्रतिवर्षी बाळशास्त्रींना जयंतीदिनी शासनस्तरावरुन अभिवादन होणार; ही बाब राज्यातील सर्व मराठी पत्रकारांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करुन 20 फेब्रुवारी रोजी शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करुन त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले आहे. 

No comments