Breaking News

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने अरविंद मेहता सन्मानित

अरविंद मेहता यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करताना खा. गिरीश बापट, ना. दत्तात्रय भरणे व इतर

Arvind Mehta honored with State Level Ideal Journalist Award

     फलटण   -:  दै. नवराष्ट्रच्या ६ व्या आणि नवभारत वृत्तपत्र समुहाच्या ८४ व्या वर्धापन दिन समारंभात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने अरविंद मेहता यांना सन्मानित करताना, 'जे न देखे सरकार, ते देखे पत्रकार' असे म्हणत खा. गिरीश बापट यांनी अरविंद मेहता यांचे तोंडभरुन कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 

नवीपेठ, पुणे येथे एस. एम. जोशी सभागृहातील शानदार सोहळ्यात नवभारत वृत्तपत्र समुह आणि दै. नवराष्ट्रच्या वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना त्या त्या क्षेत्रातील आदर्श पुरस्काराने खा. गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर मुरलीधर मोहोळ, युवराज ढमाले, नवभारत वृत्तपत्र समूहाचे प्रेसिडन्ट श्रीनिवास राव, फलटण प्रतिनिधी सुभाषराव भांबुरे  आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यातआले, त्यावेळी खा. बापट बोलत होते. 

           सामाजिक बांधीलकीची परंपरा जपणारे आपण सर्व पुणेकर असल्याचे नमूद करीत लोकसभेत पोहोचलो त्यावेळी हिंदी भाषा जास्त येत नसल्याने कुचंबना होत असे त्यावेळी दै. नवभारत टाइम्सने आपल्याला आधार दिला, नियमितपणे नवभारत वाचनाने आज आपले म्हणणे मांडण्या इतपत आपली हिंदी सुधरल्याचे सांगतानाच त्यासाठी आपले मित्र व नवभारतचे व्हा. प्रेसीडन्ट औदुंबर धनवट यांनी चांगली मदत केल्याचे खा. बापट यांनी स्पष्ट केले.

    दत्तात्रय भरणे यांनी नेहमी सार्वजनिक कामे सांगितली म्हणून ती झाल्याचे नमूद करीत, कामाचे स्वरुप पाहुन त्याबाबत योग्य निर्णय घेणारे मंत्री असावेत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण आहे, आज ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या माध्यमातून पत्रकारितेचा सन्मान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जे न देखे सरकार, ते देखे पत्रकार असे म्हणण्यास हरकत नाही. जो चांगले काम करतो त्याचा बहुमान करुन प्रोत्साहन देणे आपले काम आहे. ज्यांचा सत्कार झाला त्यांनी आपले काम अधिक गतिमान करुन त्याचा समाजाला करुन द्यावा अशी अपेक्षा खा. गिरीष बापट यांनी व्यक्त केली.

        ना. दत्तात्रय भरणे यांनी खा. गिरीश बापट यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना लोकहिताची अनेक कामे पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन प्राधान्याने केल्याचे निदर्शनास आणून देत खा. बापट यांनी विकासाची कामे करताना जात, पात, गट तट, राजकारण याकडे दुर्लक्ष केल्याने ते लोकप्रिय नेते बनल्याचे सांगतानाच सध्याचे पालकमंत्री  व उपमुख्यमंत्री ना. अजितदादांची तीच भूमिका असल्याचे ना. भरणे यांनी स्पष्ट केले.

     ना. दत्तात्रय भरणे म्हणाले, नवराष्ट्र आदर्श पुरस्काराने विविध क्षेत्रातील ज्या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले त्यांनी  समाजात वावरताना सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यांच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. बारामती व परीसरात एक चांगली टीम नवराष्ट्रने उभी केली आहे. अन्यायाच्या विरोधात लढणारे हे सर्व पत्रकार आहेत. गिरीष बापट यांनी पालकमंत्रीपदाच्या काळात खऱ्या अर्थाने खरे पालक म्हणून काम केले आहे. आजच्या या वेगळ्या कार्यक्रमामुळे सर्वांची जबाबदारी वाढली आहे. निश्चितच शासनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आम्ही योग्य ते सहकार्य करण्यास मागे राहणार नाही याची ग्वाही ना. भरणे यांनी दिली. 

       प्रारंभी सर्वव्यस्थापक राजेश वरळेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले, नवभारत वृत्तपत्र समुहाची पार्श्वभूमी व समाजकार्यातील योगदान याविषयी माहिती दिली. व्हा. प्रेसिडन्ट औदुंबर धनवट यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

      दरम्यान नवभारत वृत्तपत्र समुहाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण यांनी अरविंद मेहता यांचे फलटण येथे अभिनंदन केले.

No comments